'धर्मेंद्र प्रधान बोलतोय, एक काम आहे'; राज्यपालांना दोन फेक कॉल, सतर्कतेमुळे समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:40 IST2025-09-09T19:18:14+5:302025-09-09T19:40:26+5:30

कर्नाटकच्या राज्यपालांना केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फेक कॉल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Karnataka Governor received a fake call in the name of Union Minister Dharmendra Pradhan | 'धर्मेंद्र प्रधान बोलतोय, एक काम आहे'; राज्यपालांना दोन फेक कॉल, सतर्कतेमुळे समोर आलं सत्य

'धर्मेंद्र प्रधान बोलतोय, एक काम आहे'; राज्यपालांना दोन फेक कॉल, सतर्कतेमुळे समोर आलं सत्य

Karnataka Governor Thaawarchand Gehlot: कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फेक कॉल आल्याचे प्रकरण समोर आलं आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अशी करून दिली होती. मात्र हा कॉल फेक असल्याचे कळताच पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीने धर्मेंद्र प्रधान असल्याचे सांगत त्यांना काही कामासाठी मदत मागितली होती. राजभवनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कॉल शनिवारी दुपारी आला होता. राज्यपालांनी सुरुवातीला त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधला. मात्र काही वेळानंतर त्यांना संशय येऊ लागला. म्हणून ते थोडावेळ थांबले आणि त्यांनी पुन्हा फोन येण्याची वाट पाहिली. पण जेव्हा पुन्हा कोणताही फोन आला नाही, तेव्हा राज्यपाल गेहलोत यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. यावर धर्मेंद्र प्रधान यांनी असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले.

राज्यपाल गेहलोत यांच्या सतर्कतेमुळे आणि योग्य ती काळजी घेतल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीचे संभाव्य डाव उधळून लावले. कर्नाटकच्या राज्यपालांना सलग दोन फोन केले गेले. शनिवारी दुपारी १.३० ते १.४५ च्या दरम्यान हा प्रकार घडला. दुपारी १.३० च्या सुमारास राज्यपालांना ७९८२५३७९३२ या अनलिस्टेड नंबरवरून फोन आला. जेव्हा त्यांनी कॉल उचलला तेव्हा कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अशी करून दिली. फोन करणाऱ्याने राज्यपालांना काहीतरी सांगितले, पण त्यांना ते खरे वाटत नसल्याचा संशय आला आणि त्यांनी कॉल कट केला.

१४ मिनिटांनी त्याच व्यक्तीने राज्यपालांना फोन केला आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की ते खरोखर धर्मेंद्र प्रधान आहेत. राज्यपालांना फोन करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी पाळायची प्रोटोकॉलची माहिती होती. त्यामुळे राज्यपालांनी प्रधानशी संपर्क साधला आणि ते दुसऱ्या नंबरवरून फोन करत आहेत का याची उलटतपासणी केली. मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यपालांना कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले.

यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पोलीस उपायुक्तांना माहिती दिली आणि या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली. प्राथमिक तपासात हा कॉल कोलकाता येथून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Karnataka Governor received a fake call in the name of Union Minister Dharmendra Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.