Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 18:33 IST2023-05-07T18:32:40+5:302023-05-07T18:33:07+5:30
Karnataka Assembly Elections 2023: 'तिकडे मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे अन् पंतप्रधान-गृहमंत्री इकडे फिरत आहेत.'

Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका
Rahul Gandhi Attack On BJP: कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर उद्या(दि.8) प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी राज्यातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला.
भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले की, आम्ही यात्रा काढली, कारण आम्हाला भारत आणि कर्नाटक एकत्र करायचे होते, द्वेष संपवायचा होता. तर, भाजपवर टीका करताना ते म्हणाले, यावेळी कर्नाटकात डबल इंजिन चोरीला गेले आहे. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले की, राज्यात सर्वत्र 40 टक्के कमिशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडीच हजार कोटींना विकली जात आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान, सांगा कोणत्या इंजिनला किती मिळाले. कर्नाटकात येऊन पंतप्रधान म्हणतात की, काँग्रेसने 91 वेळा त्यांना शिवीगाळ केली. तुमचा आणि गौतम अदानी यांचा संबंध काय, असा प्रश्न मी तुम्हाला लोकसभेत विचारला, तेव्हा मी तुम्हाला भ्रष्टाचारावर प्रश्न विचारला, तेव्हा मला लोकसभेतूनच अपात्र ठरवण्यात आले, असेही राहुल म्हणाले.
मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख
राहुल गांधी यांनीही आपल्या जाहीर सभेत मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख केला. मणिपूरला आग लागली आहे, लोक मारले जात आहेत, पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना काही देणेघेणे नाही, ते इकडे कर्नाटकात प्रचार करत बसले आहेत. द्वेषाच्या राजकारणामुळे आज मणिपूर जळत आहे. या द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही 'भारत जोडो यात्रा' सुरू केली होती आणि हीच आमची विचारधारा आहे. आमच्या रोड शोमध्ये सर्व नेते एकत्र उभे राहिलेले दिसतात, तर मोदीजींच्या रोड शोमध्ये बोम्मई जी, येडियुरप्पा जी गाडीच्या बाहेर थांबतात. मोदीजी गाडीतून फिरतात, इतर नेते रस्त्यावरून चालतात, असंही ते यावेळी म्हणाले.