Karnataka Election 2018: सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी सांगितला व्हॉट्सअॅपवरील मजेशीर जोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 15:39 IST2018-05-18T15:39:36+5:302018-05-18T15:39:36+5:30
सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. ए के सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला जोक सांगितला.
Karnataka Election 2018: सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी सांगितला व्हॉट्सअॅपवरील मजेशीर जोक
नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालानंतर सरकार स्थापन सुरू करण्यावरून सुरू झालेला वाद सुप्रीम कोर्टात पोहचला. सुप्रीम कोर्टाने उद्या (ता. 19 मे) बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता उद्या भाजपा, काँग्रेस व जेडीएस या पक्षांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. ए के सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला जोक सांगितला.
भाजपाने उद्या बहुमत चाचणी न घेता सोमवारी घ्यावी, अशी मागणी केली. काँग्रेस व जनता दल सेक्यूलर या पक्षाचे आमदारही राज्याबाहेर आहेत, त्यांना यायला वेळ लागेल, असा युक्तिवाद भाजपाची बाजू मांडणारे अॅड. मुकुल रोहतगी यांनी केला. यावर न्या. सिक्री यांनी व्हॉट्स अॅपवरील विनोदाचा दाखला दिला ईगलटोन रिसोर्टचा मालकही सत्तास्थापनेचा दावा करतो. त्याच्याकडे 116 आमदारांचं संख्याबळ आहे, असं त्यांनी सांगितले. आमदारांमुळे त्या रिसोर्टमालकाला आणि कर्मचाऱ्यांना तिथे प्रवेश करणं कठीण झालं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर खंडपीठाने भाजपाची मागणी फेटाळून लावली आणि शनिवारीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश दिले.
गुरूवारी (ता. 17 मे) रोजी येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. तसंच 15 दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. काँग्रेसच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीनंतर आता उद्या बहुमत चाचणी घेतली जाणार आहे.