"हे काय चाललंय, आम्ही वैतागलोय", शेजाऱ्यानेच अडवली CM सिद्धारामय्या यांची कार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:05 IST2023-07-28T18:04:12+5:302023-07-28T18:05:04+5:30
Senior Citizen stops Siddaramaiah's Car : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यासोबत एक अनोखी घटना घडली.

"हे काय चाललंय, आम्ही वैतागलोय", शेजाऱ्यानेच अडवली CM सिद्धारामय्या यांची कार अन्...
Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यासोबत एक अनोखी घटना घडली. सिद्धारामय्या यांच्या शेजारी राहत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे तक्रार केली असून पार्किंगच्या समस्येवरून नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर कर्नाटकचेमुख्यमंत्री कृपा रोड येथे राहत असून त्यांच्या निवासस्थानाच्या समोरच तक्रार करणाऱ्या नरोत्तम यांचे घर आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरोत्तम हे जोरजोरात ओरडत असल्याचे दिसते. सर्वप्रथम त्यांचा संघर्ष सुरक्षा रक्षकांसोबत होतो. नंतर अधिकाऱ्यांसोबत बराच वेळ वाद घातल्यानंतर नरोत्तम यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे धाव घेतली. हा सर्व प्रकार पाहून सिद्धारामय्या यांनी गाडी थांबवली आणि नरोत्तम यांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
वृद्ध व्यक्तीची तक्रार काय?
मुख्यमंत्र्यांशी वाद घालणाऱ्या वृद्ध व्यक्तीने सांगितले की, ते मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राहतात आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला इतके लोक येतात की त्यांची गाडी काढताना त्यांना अडचण येते. मागील पाच वर्षांपासून हे होत आहे, त्यामुळे आम्ही वैतागलो असून आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे येणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, इथे अनेक गाड्या उभ्या केल्या जातात, त्यामुळे शेजारच्या लोकांना त्रास होतो. गाड्या गेटपासून थोड्या लांब अंतरावर का लावल्या जात नाहीत, अशीही लोकांची तक्रार असते, पण आमची अडचण अशी आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मंत्र्यांची वाहने इथेच उभी करावी लागतात. ते ज्या पदावर आहेत, त्यामुळे आम्हीही काही करू शकत नाही.