आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका सभेमध्ये सिद्धारामैय्या यांना असाच राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला खडसावत मारण्यासाठी त्याच्यावर हात वर केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे काँग्रेसच्या एका सभेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. या प्रकारामुळे सिद्धारामैय्या हे नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमानी यांची खरडपट्टी काढली. यादरम्यान, एक क्षण असा आला जेव्हा सिद्धारामैय्या यांच्या स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धारामैय्या यांचा तो पवित्रा पाहून हे पोलीस अधिकारी मागे हटले.
या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी मंचावर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उभ्या असलेल्या सिद्धारामैय्या यांनी संतप्त होत पोलीस अधिकाऱ्याला बोलावून विचारले की, अरे इकडे ये, एसपी कोण आहे? तुम्ही लोक काय करताय? सिद्धारामैय्या यांच्या या आक्रमक अवतारामुळे सभास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सिद्धारामैय्या यांनी हात वर उचलला, त्यामुळे ते पोलीस अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, असे व्हिडीओमधून दिसत आहे.