"कार थांबवू नका, ही आमदाराची गाडी आहे"; भाजपा नेत्याच्या मुलीची पोलिसांवर दादागिरी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 13:04 IST2022-06-10T12:46:50+5:302022-06-10T13:04:18+5:30
भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

"कार थांबवू नका, ही आमदाराची गाडी आहे"; भाजपा नेत्याच्या मुलीची पोलिसांवर दादागिरी अन्...
नवी दिल्ली - भाजपा आमदाराच्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुलीने सिग्नल तोडला पण त्यानंतर ही आमदाराची गाडी आहे म्हणत पोलिसांवरच दादागिरी केलेली पाहायला मिळत आहे. कर्नाटक भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बीएमडब्ल्यूमधून प्रवास करत असलेल्या मुलीने सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांनी थांबवलं असता त्यांच्यासोबत वाद घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू चालवत होती. सिग्नल लागलेला असतानाही गाडी न थांबवल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखलं. बंगळुरूमधील राजभवनाजवळ ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने सीटबेल्टही लावला नव्हता. पोलिसांनी थांबवल्यानंतर मुलीने आपली चूक कबूल करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपण कोण आहोत हे सांगत पोलिसांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.
"मला जायचं आहे, कार थांबवू नका, ओव्हरटेक केल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही बेदरकारपणे चालवत नव्हतो. अरविंद निंबावली माझे वडील आहेत" असं मुलगी पोलिसांना सांगत होती. पोलिसांनी मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
अधिक तपास केला असता मुलीने याआधी देखील ट्रॅफिक सिग्नल तोडल्याची आणि चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुलीला आतापर्यंतचा एकूण दहा हजारांचा दंड भरण्यास सांगण्याता आला. दंड भरण्यासाठी पैसे नसल्याचाही दावा केला. पण शेवटी तिच्यासोबत असणाऱ्या मित्राने 10 हजारांचा दंड भरला आणि त्यानंतर पोलिसांनी तिला जाऊ दिलं. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.