Kargil Vijay Diwas: इस्रायलची शस्त्रं, भारताचं युद्धशास्त्र अन् पाकिस्तानचा कट झाला उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 09:17 IST2018-07-25T20:54:26+5:302018-07-26T09:17:50+5:30
Kargil vijay diwas : 26 जुलै 1999 साली भारतीय लष्करानं कारगिलमध्ये चढाई करत पाकिस्तानला अस्मान दाखवले.

Kargil Vijay Diwas: इस्रायलची शस्त्रं, भारताचं युद्धशास्त्र अन् पाकिस्तानचा कट झाला उद्ध्वस्त
नवी दिल्ली- मैत्रीचा बुरखा पांघरूण पाकिस्तान नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसत आला आहे. कारगिल युद्धाच्या दरम्यानंही पाकिस्तानच्या नापाक कुरापती जगासमोर आल्या होत्या. कारगिल युद्धाला उद्या 19 वर्षे होत आहेत. 26 जुलै 1999 साली झालेल्या याच युद्धात भारतीय लष्करानं कारगिलमध्ये चढाई करत पाकिस्तानला अस्मान दाखवले. परंतु हे इस्रायल या देशाच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. पाकिस्ताननं भारताला अंधारात ठेवून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. घुसखोरीच्या ब-याच काळानंतर भारताला याची भणक लागली. जवळपास भारताच्या सर्वच चौक्यावर त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्यानं ताबा मिळवला होता. पण एवढ्या उंचावर युद्ध करून त्या चौक्या परत मिळवणे हे भारतीय लष्करासाठी थोडं जिकिरीचं काम होतं. तसेच कुरापतखोर पाकिस्ताननं कोणकोणत्या चौक्यांवर ताबा मिळवलाय आणि किती प्रमाणात पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली आहे हे जाणून घेण्यासाठी भारताकडे त्यावेळी अत्याधुनिक अशी प्रणाली नव्हती. अशातच कारगिल युद्धाच्या वेळी मित्र धर्माला जागून इस्रायल हा देश भारताच्या मदतीला धावून आला होता. त्यावेळी इस्रायलनं भारताला युद्धासाठी मोर्टार, दारूगोळा आणि लढाऊ विमानांसाठी आवश्यक असणा-या लेझर गाइडेड मिसाइल पुरवल्या होत्या.इस्रायलनं ही सर्व सामग्री कोणतंही कारण न देता भारताला दिली होती. मीडिया रिपोर्ट्नुसार, त्यावेळी भारताला मदत करू नये यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रचंड दबाव होता. परंतु त्या दबावाला झुगारून इस्रायलनं भारताला मदत देणं सुरूच ठेवलं होतं. विशेषतः इस्रायलच्या लेझर गाइडेड मिसाइल कारगिल युद्धात भारतासाठी निर्णायक ठरल्या. भारताच्या मिराज 2000 विमानांमध्ये या मिसाइल तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नापाक पाकिस्तानच्या सैन्यावर भारतीय हवाई दलानं हल्ला चढवला. त्यावेळी पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली होती. भारताच्या मिराज विमानांनी पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या सेनेकडे माघारी परतण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
इस्रायलनं भारतीय लष्कराला शत्रूंना अचूक हेरून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी गरजेची असलेली सामग्री दिली होती. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतीय लष्करानं कारगिलच्या उंच पर्वतावर बसलेल्या शत्रूंना जेरीस आणलं होतं.
कारगिल युद्धात भारतीय हवाई दलानं राबवलेली मोहीम सफेद सागरही इस्रायलनं दिलेल्या लेझर गायडेड मिसाइलमुळेच यशस्वी झाली. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लेझर गायडेड मिसाइलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैन्यावर बॉम्ब वर्षाव केला. ड्रोनसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्रायलनं त्यावेळी हेरॉन आणि सर्चर हे दोन प्रकारचे ड्रोन भारताला पुरवले होते. या ड्रोनमुळेच भारतीय लष्कराला कारगिलमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा फोटो सापडून त्यांचा ठावठिकाणा लागला होता. कारगिल युद्धामुळेच भारत आणि इस्रायल यांची मैत्री आणखी घट्ट झाली. इस्रायलनं आताही भारताला संरक्षण क्षेत्रासह इतरही क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान दिलं आहे. कारगिलमध्ये जिहादी भासवून पाकिस्तान सैन्यानं घुसखोरी केली होती. तिथून ते भारतीय लष्करावर निशाणा साधत होते. भारताकडे त्या काळात अत्याधुनिक प्रणाली नसल्यानं हवाई हल्ले करू शकत नव्हता. परंतु ऐनवेळी मदतीसाठी धावून आलेल्या इस्रायलमुळेच भारताला कारगिल युद्ध जिंकणं शक्य झालं होतं.
हेही वाचा : -
Kargil Vijay Diwas: 'ऑपरेशन बद्र' Vs. 'ऑपरेशन विजय'... का झालं कारगिल युद्ध?