कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 05:53 IST2025-07-26T05:52:49+5:302025-07-26T05:53:06+5:30
कारगिल विजयदिनी वीर मातेने दिला संदेश

कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
लामोचेन (कारगील) : १९९९च्या कारगील युद्धात वयाच्या २०व्या वर्षी विनोद कंवरच्या पतीला हौतात्म्य प्राप्त झाले. दोघांच्या पोटी आलेला एक मुलगा आता मोठा झाला आहे. हा तेजवीरसिंह राठोडही लष्करात दाखल झाला असून त्याला या वीरमातेनेही प्रोत्साहन दिले. ही माता म्हणते, ‘आपण स्वार्थी होऊ शकत नाहीत. अगोदर राष्ट्राचाच विचार आणि देशाचे संरक्षण महत्त्वाचे आहे.’ तेजवीर याचे पिता नायक भंवरसिंह राठोड १० जुलै १९९९ रोजी पॉईंट ४७०० वर यशस्वीरीत्या पुन्हा ताबा मिळवताना देशासाठी शहीद झाले होते. आज विनोद कंवर यांचे वय ४६ वर्षांचे आहे.
तेव्हा एक वर्ष वय...
१० जुलै १९९९ रोजी पिता भंवरसिंह शहीद झाले तेव्हा तेजवीरचे वय अवघे सहा महिन्याचे होते. त्याने पित्याला पाहिलेलेही नाही. तो मोठा होईल तसे त्याला लष्कराचे आकर्षण वाटू लागले. मग आईनेही प्रोत्साहन दिले आणि एका शहीद जवानाचा पुत्र आता लष्करात दाखल झाला आहे. डेहराडूनमध्ये भारतीय सैन्य अकादमीत सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच तो पूर्ण वेळ लष्करात दाखल होईल.
कंवरची तिसरी पिढी
विनोद कंवर सांगतात, ‘देशासाठी सेवा देणारी तेजवीरच्या रुपाने आमची ही तिसरी पिढी आहे. माझे वडीलही सैनिक होते. पतीने देशासाठी बलिदान दिले. आता मुलगाही देशाची सेवा करेल.’
युद्धात काय घडले होते?
कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराने या अत्यंत आव्हानात्मक अशा बर्फाळ पर्वत भागांत शत्रूला हुसकावून लावण्यासाठी मोहीम सुरू केली. जवळपास तीन महिने ही मोहीम सुरू होती. २६ जुलै १९९९ रोजी हे ‘ऑपरेशन विजय’ यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. नायक भंवरसिंह यांनी या कारवाईदरम्यान बलिदान दिले होते.
‘ड्रोन शो’ने वेधले लक्ष
कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराने द्रास भागात आयोजित केलेल्या ड्रोन शोमध्ये भारतीय तंत्रज्ञानाच्या विकासाचे आधुनिक रूप पहावयास मिळाले. या ड्रोनने अनेक क्षमतांचे दर्शन घडवले. सुमारे ४ हजार मीटर उंचीवर हे ड्रोन सहजपणे ऑपरेट होऊ शकतात. या ड्रोन शोमध्ये रोबोटिक श्वानही सहभागी होते. यांचा वापर अत्यंत दुर्गम भागांत स्फोटके शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याने लडाखसारख्या दुर्गम भागांत वातावरणाचे आव्हान असताना सैनिकांना असलेला धोका कमी करता येणार आहे. १९९९मध्ये शत्रूच्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट हे ड्रोन म्हणजे एक उडते सुरक्षा कवच ठरणार आहे.