खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:56 IST2025-07-29T11:55:44+5:302025-07-29T11:56:26+5:30
२० वर्षीय जतिन राठी हा त्याच्या ८५ वर्षीय आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिद्वारहून ५१ लीटर गंगाजल खांद्यावर घेऊन गावी आला.

फोटो - nbt
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील २० वर्षीय जतिन राठी हा त्याच्या ८५ वर्षीय आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिद्वारहून ५१ लीटर गंगाजल खांद्यावर घेऊन गावी आला. पण पुढे असं काही झालं ज्यामध्ये त्याने आपला जीव गमावला आहे. जतिन राठी एक हुशार विद्यार्थी होता आणि लवकरच तो शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होता. त्यांचे आजोबा सुभेदार (निवृत्त) अतर सिंह यांची गंगाजलने स्नान करण्याची इच्छा होती.
आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जतिन हरिद्वारला गेला आणि तिथून ५१ लीटर गंगाजल घेऊन कावड यात्रा सुरू केली. ही त्याची पहिलीच वेळ नव्हती, याआधीही जतीनने २१ लीटर गंगाजल आणलं होतं. गंगाजलचं वजन जास्त असल्याने जतिनच्या खांद्याच्या स्नायूंवर ताण आला, ज्यामुळे खांद्याला फ्रॅक्चर झालं. वेदना सहन करण्यासाठी त्याने वेदनाशामक औषधं घेण्यास सुरुवात केली आणि नंतर न थांबता आपला प्रवास पूर्ण केला.
लिव्हर, किडनीमध्ये गंभीर इन्फेक्शन
खांद्यावरून गंगाजल घेऊन आपल्या गावात पोहोचला आणि शिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक केला. परंतु या प्रवासानंतर काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडू लागली. त्याला सोनीपत येथे नेण्यात आलं, जिथे लिव्हर आणि किडनीमध्ये गंभीर इन्फेक्शन आढळलं. त्यानंतर २४ जुलै रोजी त्याला पानिपत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच २५ जुलै रोजी जतिनचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांना मोठा धक्का
जतिनच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील देवेंद्र राठी सोनीपतमध्ये राहतात आणि सरकारी शिक्षक आहेत. जतिन त्याच्या आजोबांसोबत गावात राहत होता आणि त्याची सेवा करत होता. त्याने बारावीनंतर आयईएलटीएस परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि तो परदेशात जाण्याची तयारी करत होता. जतिनचे काका राजेश राठी यांनी तरुणांना रील आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली गंगाजल आणण्याच्या स्पर्धेत न पडण्याचं आवाहन केलं आहे. एक ग्रॅम गंगाजल देखील १००० लिटरइतकं पवित्र आहे. श्रद्धा असली पाहिजे, पण शरीराकडे लक्ष देणं देखील अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.