अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:45 IST2025-05-14T18:41:19+5:302025-05-14T18:45:45+5:30
Hair Transplant Case : कानपूरमध्ये केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आता डॉक्टर असल्याचा दावा करणारी आरोपी अनुष्का तिवारी फरार आहे.

अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे दोन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये क्लिनिक, डॉक्टर आणि निकाल अगदी सारखेच आहेत. या प्रकरणात, डॉक्टर असल्याचा दावा करणारी महिला अनुष्का तिवारी फरार झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही तिच्याशी संपर्क साधला जात नाहीये. अनुष्का ग्राहकांना अर्ध्या किमतीत केस प्रत्यारोपणाचे आमिष दाखवून फोन करायची, असे पीडितांनी सांगितले. सध्या पोलीस अनुष्का तिवारीचा शोध घेत आहेत.
कानपूर येथील विनीत दुबे आणि फारुखाबाद येथील मयंक यांनी कानपूरमध्ये राहणाऱ्या आणि स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या अनुष्का तिवारीकडून केस प्रत्यारोपण करून घेतले होते. अनुष्काचे कानपूरमध्ये 'एम्पायर' नावाचे एक क्लिनिक होते, या ठिकाणी ती केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत होती. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च अंदाजे दहा ते वीस लाख रुपये आहे. पण, अनुष्का तिवारीने अर्ध्या किमतीत केस प्रत्यारोपण करण्याचं या पीडितांना कबूल केलं होतं. याच कारणास्तव तिच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची रांग असायची.
मृतांच्या नातेवाईकांनी केली कारवाईची मागणी
या प्रकरणात बळी गेलेल्या मयंकचे कुटुंब गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. मयंकच्या मृत्यूच्या वेळी पोस्टमॉर्टम करता आले नाही, पण त्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, जे मयंकचा मृत्यू केस प्रत्यारोपणामुळे झाला हे सिद्ध करू शकतात, असे त्याच्या कुटुंबाने म्हटले आहे.
अशा जाळ्यात अडकू नका!
दुसरीकडे, शहराचे सीएमओ हरिदत्त नेमी यांनी म्हटले की, केस प्रत्यारोपण करण्याचा अधिकार फक्त त्वचारोगतज्ज्ञांनाच आहे. याशिवाय, इतर कोणतीही व्यक्ती केस प्रत्यारोपण करू शकत नाही. असे असूनही, अनेक ढोंगी स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात आणि केस प्रत्यारोपण करतात. कोणीही अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये. केस प्रत्यारोपणाच्या प्रकरणाची चौकशी सीएमओकडे आहे आणि अहवाल लवकरच सादर केला जाईल.