कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी कन्नडिगांचा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; समोर आलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:55 IST2025-02-22T17:46:21+5:302025-02-22T17:55:33+5:30
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला करुन चालकाला मारहाण केली होती

कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी कन्नडिगांचा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; समोर आलं सत्य
Maharashtra ST Bus Attack: कर्नाटकमध्येमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला करत काळे फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसला काळे फासत चालकाला मारहाण केली. कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकाला कन्नड येतं का? असं विचारत मारहाण केली . त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला आणि बसला काळं फासण्यात आलं. या प्रकारानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटला आहे. मात्र आता या प्रकरणात वेगळीच बाब समोर आली आहे. कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटीच्या चालकाल मारहाण केल्याचे समोर आलं आहे.
शुक्रवारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरवर बेळगावी येथे मारहाण करण्यात आली होती. मराठी येत नसल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा कंडक्टर महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी यांनी केला होता. सुळेभावी गावात एक महिला तिच्या पुरुष साथीदारासह बसमध्ये चढली आणि ती मराठीत बोलत होती. मला मराठी येत नसल्याचे सांगून त्यांना मी कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मला मराठी येत नाही, असे सांगताच महिलेने मला शिवीगाळ करून मराठी शिकावे लागेल, असं सांगितले. त्यानंतर अचानक मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला, अशी माहिती कंडक्टरने दिली होती.
या घटनेनंतर कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला केला. यावेळी कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकाला कन्नड येथे का? अशी विचारणा करत मारहाण केली. त्यानंतर चालकाला आणि बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. मात्र आता कानडी कंडक्टरने केलेला गुन्हा लपवण्यासाठी कानडी संघटनांनकडून मराठी भाषिकांना टार्गेट करण्यात आलं आहे.
सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी या सगळ्या प्रकाराबाबत व्हिडीओ पोस्ट करुन माहिती दिली आहे. काल बेळगावमध्ये मारहाळ गावाच्या आसपास बसमध्ये अल्पवयीन भाऊ-बहीण प्रवास करत होते. त्यावेळी मुलीन कंडक्टर कडून दोन तिकिटे मागितली. पण भावाचा पास असल्याने तिने एकच तिकीट द्या असं सांगितलं. यावर कंडक्टरने त्या मुलीला शिवीगाळ केली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या सगळ्या प्रकरणानंतर तिथल्या लोकांनी कंडक्टरला जाब विचारला. त्यांनाही कंडक्टरने उद्धटपणे उत्तर दिली. त्यामुळे नागरिकांनी त्याला चोप दिला. या सगळ्या प्रकारानंतर कानडी संघटना रस्त्यावर उतरल्या. या घटनेनंतर आपला काळे कृत्य बाहेर येईल म्हणून कंडक्टरने याला वेगळं वळण देण्याचे काम केले. कंडक्टरने मला मराठी बोलता येत नाही असं म्हटल्यानंतर लोकांनी मारहाण केली असं सांगितलं. या घटनेची शहानिशा न करता कानडी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत त्या कंडक्टर वर गुन्हा दाखल केला आहे, असं शुभम शेळके यांनी म्हटलं.
अल्पवयीन मुली बरोबर ज्या प्रकारे गैरवर्तनूर झाली त्याचा तपास करून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं असताना कानडी संघटना त्या कंडक्टरचे समर्थन करत आहेत, असंही शुभम शेळके यांनी म्हटलं.
तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात - प्रताप सरनाईक
"गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही, तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात असतात. वाद वाढायला नको. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत," असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.