काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारवर डाव्या नेत्यांची घणाघाती टीका, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:16 PM2021-09-28T22:16:16+5:302021-09-28T22:17:18+5:30

Kanhaiya Kumar News: कन्हैया कुमारने भाकप सोडल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी कन्हैया कुमारवर जोरदार टीका केली आहे.

Kanhaiya Kumar, who has joined the Congress, has been sharply criticized by Left leaders | काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारवर डाव्या नेत्यांची घणाघाती टीका, केला गंभीर आरोप

काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारवर डाव्या नेत्यांची घणाघाती टीका, केला गंभीर आरोप

Next

नवी दिल्ली - जेएनयूमधील विद्यार्थी चळवळीतून देशभरात चर्चेत आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने आज डाव्या भाकपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, कन्हैया कुमारने भाकप सोडल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी कन्हैया कुमारवर जोरदार टीका केली आहे. ( Kanhaiya Kumar, who has joined the Congress, has been sharply criticized by Left leaders)

ते म्हणाले की, कन्हैया कुमारने आमच्या पक्षातून स्वत:च स्वत:ला बाहेर काढून घेतले आहे. सीपीआयने नेहमीच जातीविहीन आणि वर्गविहीन समाजासाठी लढाई लढली आहे. कन्हैया कुमारच्या स्वत:च्या काही  वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा राहिल्या असतील. यावरून हे समजते की, त्याचा कम्युनिस्ट आणि वर्किंग क्लासच्या विचारसरणीवर विश्वास नव्हता. कन्हैया कुमारच्या येण्याआधीही कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्याच्या जाण्यानंतरही पक्ष कायम राहील. त्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येणार नाही. आमचा पक्ष निस्वार्थ संघर्ष आणि बलिदानासाठी आहे. कन्हैया आमच्या पक्षासाठी स्पष्ट आणि ईमानदार राहिला नाही.

तत्पूर्वी आज कन्हैया कुमार याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तो म्हणाला की, आज देशातील कोट्यवधी तरुणांना असं वाटतंय की, काँग्रेस पक्ष वाचला नाही तर देशसुद्धा वाचणार नाही. असा परिस्थितीत मी लोकशाही भक्कम करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशात वैचारिक संघर्षाला काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. यावेळी कन्हैया कुमार याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेही आभार मानले.

कन्हैया म्हणाला की, मला वाटते की, या देशाच्या सत्तेमध्ये एका अशा विचारसरणीचे लोक आहेत जे या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, त्याची मूल्ये, इतिहास आणि वर्तमान संपवत आहेत. या विचारसरणीविरोधात लढले पाहिजे. देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीवादी पक्षात मी अशासाठी प्रवेश करत आहे की, जर हा पक्ष राहिला नाही तर हा देशही राहणार नाही.

मूळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमधील कथित देशविरोधी घोषणाबाजीनंतर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे चर्चेत आला होता. कन्हैयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र त्या निवडणुकीत कन्हैयाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. 

Web Title: Kanhaiya Kumar, who has joined the Congress, has been sharply criticized by Left leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.