कामठी.... खतांचा काळाबाजार
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:39+5:302015-02-15T22:36:39+5:30
रासायनिक खतांचा काळाबाजार

कामठी.... खतांचा काळाबाजार
र सायनिक खतांचा काळाबाजार महालगाव परिसरातील शेतकरी त्रस्त : पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार कामठी : तालुक्यातील नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव येथील कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची शेतकऱ्यांनी ओरड आहे. यामुळे महालगाव व परिसरातील शेतकरी त्रस्त असून याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. महालगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून विविध प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशक औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अश्विन इटनकर (रा. महालगाव, ता. कामठी) या शेतकऱ्याने १५ जानेवारीला युरिया रासायनिक खताची एक बॅग सदर कृषी सेवा केंद्र दुकानातून खरेदी केली. यात शेतकऱ्याने युरियाच्या एका बॅगेसाठी ३२० रुपये दुकानदारास दिले. परंतु सदर कृषी सेवा केंद्र मालकाने शेतकऱ्यास २९८ रुपयांची पावती दिली. शिवाय, दुकानदाराने शेतकऱ्यास पक्के बिल न देता डिलवरी मेमोची साधी पावती दिली.येथील कृषी सेवा केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना पक्के बिल न देता नेहमी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांची खरेदी केल्यानंतर एकाही शेतकऱ्यास मुख्य बिलाची प्रत न देता डिलवरी मेमोची पावती दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुकानावरील फलकांवर खतांच्या किमंतीचे दर, उपलब्ध साठा लावला जात नाही. कृषी सेवा केंद्रधारक अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी २७ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी व मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे महालगावचे माजी सरपंच प्रकाश इटनकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. खतांच्या काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकानदारांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश इटनकर, धनराज खांडेकर, हिरामण काटवले, कोठीराम ठाकरे, सुकराम मुळे, भोजराज मेश्राम, सुरेश शिंघाडे, अश्विन इटनकर आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)