मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:59 IST2018-12-12T18:58:53+5:302018-12-12T18:59:47+5:30
काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही हायकमांडचा निर्णय अंतिम राहिल, यावर सर्वच आमदारांचे एकमत झाले होते.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समजतंय. राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. तर काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही हायकमांडचा निर्णय अंतिम राहिल, यावर सर्वच आमदारांचे एकमत झाले होते. त्यानंतर, दिल्लीतून चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसमध्ये गटबाजीही तयार झाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि युवा नेते ज्योतिर्रादित्य सिंधिया यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी होत होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडपुढे याबाबत पेच निर्माण झाला होता.
कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे काँग्रेस आणि सोबत येणाऱ्या 7 आमदारांची मिळून, एकूण 121 उमेदवारांची यादी दिली आहे. मात्र, ज्योतिर्रादित्य सिंधिया अन् कमलनाथ यांच्या समर्थकांची रस्त्यावरच घोषणाबाजी सुरू केली होती. तर, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी कमलनाथ यांची भेट घेतल्याने कमलनाथ यांचे नाव पुढे येत होते. पण, ज्योतिर्रादित्य सिंधिया हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, असे वाटले होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच कमलनाथ यांच्याच गळ्यात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.