कमल हासन रजनीकांतच्या भेटीला, तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:07 IST2018-02-18T16:03:53+5:302018-02-19T03:07:50+5:30
दक्षिणेकडचे दोन मोठे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या तामिळनाडूमधील राजकीय प्रवेशामुळे मोठ्या उलथापालथी होऊ लागल्या आहेत.

कमल हासन रजनीकांतच्या भेटीला, तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग
चेन्नई- दक्षिणेकडचे दोन मोठे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या तामिळनाडूमधील राजकीय प्रवेशामुळे मोठ्या उलथापालथी होऊ लागल्या आहेत. कमल हासन यांनी रजनीकांतची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकत्र लंचही केला. या भेटीनंतर तामिळनाडू राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही राजकीय भेट नसल्याचं कमल हासन यानं मीडियाला सांगितलं आहे. फक्त एक शिष्टाचार म्हणून मी रजनीकांतची भेट घेतली आहे, असं कमल हासन म्हणाले, तर रजनीकांत यांनी कमल हासन यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कमल हासन लोकांची सेवा करू इच्छितात. ते राजकारणात फक्त प्रसिद्धीच्या झोतात यावं म्हणून आले नाहीत. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, त्यांना राजकारणात यश मिळो, असं रजनीकांत म्हणाले आहेत.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली होती. रजनीकांत हे भगवे राजकारण करीत असून ते भाजपकडे झुकलेले असल्याने त्यांच्याशी युती करणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले होते. रजनीकांत यांनी भगवे राजकारण करणे कायम ठेवले तर त्यांच्याशी मी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. परंतु मैत्री व राजकारण या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.
कमल हसन म्हणाले होते की, आम्हा दोघांच्या राजकीय पक्षांमध्ये काही विचार समान असतील किंवा दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये काही समान मुद्दे असतील तरच युती होण्याची शक्यता निर्माण झाली असती. राज्यातील निवडणुकांच्या आधी मी कोणाशीही युती करणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जर कोणालाच बहुमत मिळाले नाही तर मी विरोधी पक्षात बसणे पसंत करेन असे सांगून कमल हसन म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही पक्षात जायची मला इच्छा नव्हती. त्यामुळे मी स्वत:चा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल व अन्य पक्षांनी दिलेले युतीचे प्रस्ताव मी स्वीकारले नाहीत.