कौतुकास्पद! १० वचनं, हुंड्यात ११ हजार रोपं; बैलगाडीतून वधूची पाठवणी, लग्नाचा अनोखा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:34 IST2025-03-03T11:34:53+5:302025-03-03T11:34:53+5:30
लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

कौतुकास्पद! १० वचनं, हुंड्यात ११ हजार रोपं; बैलगाडीतून वधूची पाठवणी, लग्नाचा अनोखा आदर्श
उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रईसपुर गावातील सुरविंदर किसान याचं लग्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली. पारंपारिक लग्नांच्या तुलनेत या लग्नात अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्या समाजात बदल आणि साधेपणाचा संदेश देतात. त्यामुळे या लग्नाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बैलगाडीतून वधूची पाठवणी
लग्न म्हटलं की मोठा खर्च, धामधूम आणि जय्यत तयारी ही आलीच. पण हल्ली काही लोकांचा साधेपणात लग्न करण्याकडे कल असतो. कमी पाहुणे आणि साध्या पद्धतीत लग्न केल्याने अनावश्यक खर्चही टाळता येतो. याच दरम्यान सुरविंदरने त्याचं लग्न साधेपणाने करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अनोख्या लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा दिला जात आहे पण तो खूपच हटके आहे.
हुंड्यात ११ हजार रोपं
हुंडा म्हणून तब्बल ११ हजार रोपं घेतली जात आहेत. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक चांगलं पाऊल आहे. तसेच नववधूची बैलगाडीतून पाठवणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे हे लग्न आणखी खास होणार आहे. सुरविंदरने त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत १० वचनं दिली आहेत, ज्यातून समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणाप्रती त्याची वचनबद्धता आणि जागरुकता दिसून येते.
लग्नात ब्लड डोनेशन कँप
लग्नादरम्यान ब्लड डोनेशन कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरविंदर म्हणाला की, या उपक्रमाचं उद्दिष्ट हे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं आहे. त्याचा असा विश्वास आहे की हे पाऊल केवळ समाजाला सक्षम बनवणार नाही तर तरुणांनाही प्रेरणा देईल. हे लग्न साधेपणाने करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे एक उदाहरण आहे, जे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. या अनोख्या लग्नाने केवळ गाझियाबादमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात साधेपणा, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा संदेश दिला आहे.