“PM मोदींचे कथन चुकीचे, एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली तर ऑस्कर मिळेल”; BRS चा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 16:34 IST2023-10-04T16:33:02+5:302023-10-04T16:34:41+5:30
BRS Vs PM Narendra Modi: NDA मध्ये घ्यायचे नव्हते तर २०१८ ला युतीचा प्रस्ताव का पाठवला होता, अशी विचारणा करत आम्ही लढवय्ये आहोत, फसवणूक करणार नाही, असा पलटवार BRSने केला.

“PM मोदींचे कथन चुकीचे, एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली तर ऑस्कर मिळेल”; BRS चा पलटवार
BRS Vs PM Narendra Modi: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलंगणमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निजामाबाद येथील एका रॅलीला संबोधित करताना एक मोठा गौप्यस्फोट केला होता. केसीआर आणि बीआरएसवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला बीआरएसने उत्तर दिले असून, पंतप्रधान मोदी छान स्टोरीटेलर आहेत. त्यांनी एखाद्या सिनेमासाठी स्क्रिप्ट लिहिली तर ऑस्कर जिंकू शकतील, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.
के. चंद्रशेखर राव हे NDA मध्ये येण्यास इच्छूक होते. मात्र, मीच नको म्हटले. मी केसीआर यांना एनडीएमध्ये प्रवेश नाकारला. केसीआर दिल्लीत आल्यानंतर मला भेटले होते. मला एनडीएचा भाग व्हायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र, KTR यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, अशी त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राजा-महाराजा लागून गेलात का? सरकार कोणाचे असावे, याचा निर्णय जनता घेईल, असा मोठा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. याला केसीआर यांचे पुत्र आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी प्रत्युत्तर दिले.
२०१८ मध्ये आलेला युतीचा प्रस्ताव तत्काळ फेटाळला
पंतप्रधान मोदींना उत्तर देताना केटीआर म्हणाले की, ते असत्य कथन करत आहेत. ते एक उत्तम पटकथा लेखक आणि कथाकार बनतील. ऑस्कर जिंकू शकतील. भाजप हा सर्वांत मोठा खोटारडे पक्ष आहे. सन २०१८ च्या निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष डॉ. के लक्ष्मण यांच्यामार्फत युतीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आम्ही तो दुसऱ्या क्षणीच फेटाळला. दिल्लीच्या मान्यतेशिवाय हे होऊ शकते का? असा सवाल करत आम्ही लढवय्ये आहोत, फसवणारे नाही, या शब्दांत केटीआर यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेतील वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला. बीआरएस म्हणजे 'भाजप रिश्तेदार समिती' असल्याचे आधीच सांगितले होते, असे सांगत राहुल गांधींनी टीका केली.