हरियाणाच्या ३३ वर्षीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल सतत नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयए आणि आयबीच्या ताब्यात असलेल्या ज्योतीकडून आता एक डायरी जप्त करण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. या डायरीत एकूण १० ते ११ पाने आहेत, त्यापैकी आठ पाने तिच्या सामान्य प्रवासाच्या अनुभवांना समर्पित आहेत. तर, तीन पाने विशेषतः पाकिस्तान प्रवासाच्या घटनांवर लक्ष केंद्रित करतात. डायरीतील नोंदींमध्ये तिच्या भावना, पाकिस्तानात घालवलेला वेळ आणि तिथल्या लोकांशी संबंधित तिच्या आठवणींचा उल्लेख आहे.
डायरीत काय लिहिले आहे?ज्योतीने तिच्या डायरीत पाकिस्तानच्या प्रवासाबद्दल सांगताना लिहिले की, "पाकिस्तानचा १० दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर, आज मी माझ्या देशात भारतात परतत आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे मला माहित नाही, पण मी प्रार्थना करते की सगळ्यांच्या मनातील अढी दूर व्हाव्यात. आपण सर्व एकाच मातीपासून बनलेले आहोत, एकाच भूमीचे लोक आहोत."
डायरीमध्ये तिने पाकिस्तानमध्ये मिळालेल्या प्रेमाचे आणि आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले आहे. तिने असेही लिहिले आहे की, तिथल्या लोकांनी ज्या मोकळेपणाने आणि प्रेमाने तिचे स्वागत केले, तो तिच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. ज्योतीने तिच्या डायरीत पाकिस्तान सरकारकडून आलेल्या एका खास विनंतीचाही उल्लेख केला आहे.
पाकिस्तान सरकारने तेथील मंदिरांचे संरक्षण करावे आणि १९४७ मध्ये विभक्त झालेल्या कुटुंबांना भेटण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही तिने म्हटले आहे. यावरून असे दिसून येते की, ज्योती केवळ पर्यटक म्हणून नाही तर भावनिक मोहिमेवरही पाकिस्तानला गेली होती. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असल्याचे म्हणत तिने पाकिस्तान हा 'क्रेझी आणि कलरफुल' देश म्हटले आहे.