पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचे राजस्थानशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. तपासात असे दिसून आले आहे की, ज्योती अनेक वेळा राजस्थानमध्ये आली आहे. राजस्थानच्या संवेदनशील सीमावर्ती भागातही तिने अनेक दिवस घालवले. या ठिकाणी तिने स्थानिक लोकांना अनेक संशयास्पद प्रश्न विचारले.
राजस्थान सीमेवर ज्योती कोणाच्या घरी राहिली?सुरक्षा एजन्सींनुसार, ज्योती पाकिस्तान सीमेपासून फक्त १० किमी अंतरावर असलेल्या बाडमेर जिल्ह्यातील रामसर तहसीलमधील झेलुन गावात खामिशा खानच्या घरी राहत होती. येथे तिने स्थानिक लोकांना संवेदनशील प्रश्न विचारले आणि एक व्हिडीओ बनवला.
मुनाबाओ रेल्वे स्थानकाचा व्हिडीओज्योतीने देशातील सर्वात संवेदनशील आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानक असलेल्या मुनाबाओ रेल्वे स्थानकाचा व्हिडीओ देखील बनवला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी विशेष परवानगी आवश्यक असते. आता चौकशीत असे आढळून आले की, तिने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये तिने मुनाबाओ स्टेशनवरील संपूर्ण लेआउट आणि सुरक्षा व्यवस्था दाखवली आहे. तिने सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं आहे.
ज्योतीच्या एका व्हिडिओमध्ये ती झेलुन गावातील वन विभागाच्या काटेरी तारांच्या कुंपणाला भारत-पाकिस्तान सीमा म्हणत असल्याचे दिसून आले होते. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, "पाहा... पाकिस्तानातून एक बकरी भारतात आली आहे. भारतात आपले स्वागत आहे." मात्र, तपासात असे दिसून आले की, ही प्रत्यक्षात सीमा नव्हती तर वन विभागाचे काटेरी तारांचे कुंपण होते.
लोकांना विचारले संशयास्पद प्रश्न
ज्योतीने सीमावर्ती भागातील स्थानिकांना अनेक संशयास्पद प्रश्न विचारले. लाकूड कुठून आणता? मुले कुठे शिकायला जातात? इथे वीज आहे की नाही? तुम्ही पाकिस्तानी सीमेजवळ जाता का? बाडमेर आणि मुनाबाओला रेल्वेने प्रवास केला आहे का? असे प्रश्न तिने लोकांना विचारले आहेत.
तपासात असे दिसून आले आहे की, ज्योती ट्रेनने बाडमेरला पोहोचली होती आणि तिथून ती मुनाबाओला गेली होती. तिने तिच्या ब्लॉगवर मुनाबाओ स्टेशन तसेच सीमावर्ती भागांबद्दल सविस्तर माहिती शेअर केली होती. ही माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी उपयुक्त ठरू शकली असती, असे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.