ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:38 IST2025-05-20T10:36:53+5:302025-05-20T10:38:04+5:30
Jyoti Malhotra : तपास संस्था युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत.

ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
ओडिशाचे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी "जर कोणतीही व्यक्ती पाकिस्तानला संवेदनशील माहिती लीक करण्यात सहभागी आढळली तर त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही" असं म्हटलं आहे.
तपास संस्था युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली ज्योतीला अटक करण्यात आली आहे. ज्योतीने पुरीमधील जगन्नाथ मंदिर, कोणार्क आणि चिल्कासारख्या ठिकाणी भेट दिली होती आणि ती पुरीतील एका युट्यूबरच्या संपर्कात होती असंही म्हटलं जातं.
कठोर कारवाई केली जाईल
पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही बाब गंभीर आहे आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याची चौकशी करत आहे. जर ओडिशातील कोणताही रहिवासी यामध्ये सहभागी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. व्यक्ती हेरगिरीत थेट सहभागी असो किंवा अप्रत्यक्षपणे मदत करत असो, त्याला सोडलं जाणार नाही."
ज्योती एका युट्यूबरच्या संपर्कात
ओडिशा गुन्हे शाखेचे आयजीपी सार्थक सारंगी म्हणाले की, ज्योती मल्होत्रा पुरी येथील एका युट्यूबरच्या संपर्कात होती हे आम्हाला समजलं आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. वस्तुस्थिती तपासली जात आहे.
पुरीच्या महिला युट्यूबरने दिलं स्पष्टीकरण
पुरीच्या महिला युट्यूबरने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी ज्योतीशी फक्त युट्यूबवरून मैत्री केली. ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहे हे मला माहित नव्हतं. जर मला कोणत्याही तपास संस्थेकडून चौकशीला सामोरं जावं लागलं तर मी पूर्ण सहकार्य करेन. देश सर्वोच्च आहे. जय हिंद असं म्हटलं आहे.