हिसार - ज्योती मल्होत्रा जी काही दिवसांपूर्वी एक युट्यूबर, ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून भारतात प्रसिद्ध होती. ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून सर्वांच्या नजरेत आली. पाकिस्तानातील लोक ज्योतीची सोशल मीडियावर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत तर भारतात तिने केलेल्या हेरगिरीमुळे सुरक्षा यंत्रणेच्या जाळ्यात अडकली. आता या कहाणीत नवा ट्विस्ट सर्वांनाच आश्चर्य करणारा आहे. ज्योतीचे कौटुंबिक संबंध पाकिस्तानशी असल्याचं पुढे आले आहे.
माहितीनुसार, ज्योती मल्होत्राचं कुटुंब फाळणी आधी पाकिस्तानच्या मुल्तान आणि बहावलपूर शहरात राहत होते. ज्योतीचे आजोबा मुल्तान आणि आजी बहावलपूरमधील आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवेळी ज्योतीचे कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले. हिसार पोलीस ज्योतीच्या बँक खात्याची आणि व्यवहारांची बारकाईने चौकशी करत आहे. तिला परदेशातून फंडिंग झाल्याची शंका अधिकाऱ्यांना आहे. पोलिसांनी तिच्या जवळून ३ मोबाईल, १ लॅपटॉप जप्त केला आहे. ज्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्योती ३ वेळा पाकिस्तानात आणि अलीकडेच बांगलादेशात जाऊन आली. ती पुन्हा बांगलादेशात जाण्याची तयारी करत होती.
ज्योती पाकिस्तानात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे, उच्चभ्रू हॉटेलमध्ये राहणे, कायम हवाई प्रवास करणे, त्याशिवाय पाकिस्तानात अशा भागात चित्रिकरण करणे जिथे सामान्य नागरिकांना जाण्यास बंदी आहे हे यंत्रणेच्या रडारवर आले आहे. कोरोना काळात खासगी नोकरी सोडून ज्योतीने युट्यूब चॅनेल सुरू केला आणि पाकिस्तानची चांगली प्रतिमा दाखवण्यास सुरुवात केली. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले. एक व्हिडिओ तर १२ मिलियन लोकांनी पाहिला. केवळ २ वर्षातच ज्योतीचे १ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स झाले. युट्यूबवर सिल्व्हर बटण मिळाले.
दानिशशी ओळख आणि चॅट डिलिट करण्याचा कट
एनआयए, आयबी आणि हरियाणा पोलीस तपासात ज्योतीची ओळख पाकिस्तानी उच्चायोग कार्यालयात तैनात दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी झाली. दानिश आणि ज्योती यांच्यातील अनेक चॅट डिलिट करण्यात आलेत. ज्याचे फॉरेन्सिक तपासात तांत्रिक पुरावे मिळण्याची आशा आहे. ज्योती केवळ पाकिस्तान, बांगलादेशात नाही तर पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातही जसं चिकन नेक, नदिया, बैरकपूर, कोलकाता येथेही गेली होती. हे दौरे पर्यटनासाठी नव्हे तर नेटवर्किंगसाठी केले होते अशी शंका भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. ज्योतीने स्वर्ण मंदिर, काश्मीरातील टूरिस्ट स्पॉट्स आणि आर्मी बेसचे व्हिडिओ बनवले आणि त्यांचे लोकेशन डिटेल्स शेअर केलेत.
दरम्यान, ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी म्हटलं की, पोलिसांनी अद्याप काही माहिती दिली नाही. आमचा मोबाइलही पोलिसांकडे आहे. तर आताच काही सांगणे घाईचे ठरेल परंतु फंड ट्रांजेक्शनबाबत तपास सुरू आहे. ज्योती केवळ चेहरा आहे याच्यामागे अनेक चेहरे आणि नेटवर्क असू शकतात, ज्याचा खुलासा पुढच्या काही दिवसांत होईल असं पोलीस अधीक्षक शशांक कुमार यांनी सांगितले.