पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा नावाच्या एका प्रसिद्ध महिला युट्युबरला सुरक्षा यंत्रणांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आता तिच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर येत आहेत. यादरम्यान, वर्षभरापूर्वीचं एक ट्विट व्हायरल होत असून, त्यामधून एका व्यक्तीने ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक दावा करत धोक्याचा इशारा दिला होता.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी आणि भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३३ वर्षीय ज्योती मल्होत्राबाबत कपिल जैन नावाच्या व्यक्तीने वर्षभरापूर्वीच धक्कादायक दावा केला होता. त्याने ज्योती मल्होत्रा हिच्या संशयास्पद हालचालींबाबत चिंता व्यक्त करत एनआयएने तिची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १ मे २०२४ रोजी कपिल जैन नावाच्या व्यक्तीने ज्योती मल्होत्रा हिच्या युट्युब चॅनेलचे स्क्रिनशॉट लावून लिहिले होते की, एनआयएने कृपया या महिलेवर लक्ष ठेवलं पाहिजे. ती आधी पाकिस्तानच्या दूतावासात गेली. त्यानंतर दहा दिवसांसाठी पाकिस्तानमध्ये गेली. आता ती काश्मीरमध्ये जात आहे. कदाचित या सर्वामागे काही संबंध असू शकतो, अशी शंका त्याने उपस्थित केली होती.
ज्योती मल्होत्रा हिने दोन वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. तिथे बनवण्यात आलेले व्हिडीओ तपास यंत्रणांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिने पाकिस्तानमधून अनेक व्हिडीओ आणि रिल्स पोस्ट केले होते. २०२४ मध्ये ज्योती काश्मीरही फिरून आली होती. तिने दल सरोवर, श्रीनगर-बनिहाल महामार्गाचे व्हिडीओ अपलोड केले होते.