नोटा सापडल्या प्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली पोलिसांची टीम निवासस्थानी पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:41 IST2025-03-26T16:29:04+5:302025-03-26T16:41:23+5:30
दिल्ली पोलीस न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. पोलिस पथकासोबत सर्वोच्च न्यायालयाचे दोन-तीन कर्मचारीही उपस्थित होते.

नोटा सापडल्या प्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढल्या; दिल्ली पोलिसांची टीम निवासस्थानी पोहोचली
दिल्लीतील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी नोटा सोपडल्या. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी पोलिसांचे पथक पोहोचले आहे. नवी दिल्ली जिल्हा डीसीपी देवेश महाला तपासणीसाठी आले आहेत. त्यांच्यासोबत तुघलक रोडचे एसीपी वीरेंद्र जैन आणि सर्वोच्च न्यायालयाचे दोन-तीन कर्मचारीही आत गेले आहेत.
हे सर्व अधिकारी दुपारी २.१५ वाजता न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगण्यात आले. हे लोक स्टोअर रूमची तपासणी करत आहेत, तिथे १४ मार्च रोजी रात्री ११.१५ वाजता आग लागली होती.
मला सभागृहात बोलू दिले जात नाही; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर आरोप
आगीमुळे स्टोअर रूममध्ये पोत्यांमध्ये ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात नोटा जळून खाक झाल्याचे समोर आले. काल, मंगळवारी, तीन न्यायाधीशांची समितीही चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. तिन्ही न्यायाधीशांनी सुमारे ४५ मिनिटे तपासणी केली.
सुप्रीम कोर्टाची टीमही पोहोचली
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अंतर्गत समितीचे तीन सदस्य मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याच्या आरोपांची चौकशी सुरू केली.
समितीचे सदस्य पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जीएस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनु शिवरामन यांनी मंगळवारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या ३० तुघलक क्रेसेंट येथील निवासस्थानी भेट दिली आणि ३०-३५ मिनिटे त्यांच्या घरी चौकशी केली.
दुपारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानावरून निघण्यापूर्वी समितीने घटनास्थळाची पाहणी केली. समिती सदस्य तेथे पोहोचले तेव्हा न्यायमूर्ती वर्मा त्यांच्या निवासस्थानी होते की नाही याची माहिती समोर आलेली नाही. १४ मार्च रोजी रात्री ११:३५ वाजता न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली, यावेळी रोख रक्कम सापडल्याचा आरोप आहे.