सुप्रीम कोर्टात होणार पूर्ण क्षमतेने न्यायदान; सर्व ३४ जागा भरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:05 IST2025-05-31T07:05:08+5:302025-05-31T07:05:20+5:30

तीन न्यायाधीशांनी घेतली शपथ

Justice will be administered in full force in the Supreme Court All 34 seats filled | सुप्रीम कोर्टात होणार पूर्ण क्षमतेने न्यायदान; सर्व ३४ जागा भरल्या

सुप्रीम कोर्टात होणार पूर्ण क्षमतेने न्यायदान; सर्व ३४ जागा भरल्या

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्या. एन. व्ही. अंजारिया, न्या. विजय बिश्नोई व न्या. ए. एस. चांदूरकर या तिघांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. सर्वोच्च न्यायालय परिसरात शुक्रवारी आयोजित एका समारंभात न्यायाधीशांनी शपथ घेतली.

तिघांनी शपथ घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह सर्व ३४ जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय पूर्ण क्षमतेने काम करू शकणार आहे. कॉलेजियमने सोमवारी न्या. अंजारिया, न्या.बिश्नोई व न्या. चांदुरकर यांची नियुक्तीसाठी शिफारस केली होती. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी तिघांच्या नियुक्तीची घोषणा केली.

मध्य प्रदेश हायकोर्टात ३ न्यायाधीशांना शपथ 

दुसरीकडे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा यांनी शुक्रवारी जबलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात तीन न्यायाधीशांना शपथ दिली. न्या. दीपक खोत, न्या. अमित सेठ व न्या. पी. के. द्विवेदी या तिघांना पदाची शपथ देण्यात आली. या तिघांनी शपथ घेतल्याने राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३५ झाली आहे. येथील उच्च न्यायालयात न्यायाधीशांची ५३ मंजूर पदे आहेत.
 

Web Title: Justice will be administered in full force in the Supreme Court All 34 seats filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.