लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केवळ महिला रडत होती या कारणावरून हुंडा छळाचा खटला बनू शकत नाही, असे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश नीना बंसल कृष्णा यांनी एका पुरूष आणि त्याच्या कुटुंबाला क्रूरता आणि हुंडा छळाच्या आरोपातून निर्दोषमुक्त करण्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेला फेटाळताना ही टिप्पणी केली.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, महिलेचा तिच्या पती आणि सासरच्या लोकांकडून छळ केला जात होता आणि हुंडा मागितला जात होता. महिलेचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये झाले होते.
महिलेच्या कुटुंबाचा दावा काय? : महिलेच्या कुटुंबाने लग्नावर चार लाख रुपये खर्च केले. परंतु पतीने बाइक, रोख रक्कम व सोन्याच्या बांगड्या मागितल्या. महिलेला दोन मुली होत्या व महिलेचा २०१४ मध्ये मृत्यू झाला.
उच्च न्यायालयाने म्हटले...
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मृत महिलेच्या बहिणीचा जबाब कलम १६१ अंतर्गत नोंदवण्यात आला. तिने म्हटले की होळीच्या निमित्ताने तिने तिच्या बहिणीला फोन केला असता ती रडत होती. मात्र, केवळ महिला रडत असल्याने हुंड्यासाठी छळाचा कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला अगोदरच निर्दोष केले होते आणि महिलेचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला आहे असे म्हटले. पोस्टमार्टम अहवालात मृत्यूचे कारण क्रूरता नव्हे तर न्यूमोनिया असल्याचे म्हटले आहे, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.