आडवाणींप्रमाणेच जेटलीही निर्दोष सिद्ध होतील - पंतप्रधान मोदींना विश्वास
By Admin | Updated: December 22, 2015 14:54 IST2015-12-22T12:15:03+5:302015-12-22T14:54:37+5:30
हवाला प्रकरणातून ज्याप्रमाणे लालकृष्ण आडवाणी दोषमुक्त झाले, त्याप्रमाणेच डीडीसीएप्रकरणी जेटलींचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

आडवाणींप्रमाणेच जेटलीही निर्दोष सिद्ध होतील - पंतप्रधान मोदींना विश्वास
>ऑनलाइन लोकमत
नली दिल्ली, दि. २२ - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ज्याप्रमाणे हवाला प्रकरणातून दोषमुक्त झाले, त्याचप्रमाणे डीडीसीए प्रकरणात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निर्दोषत्वही लवकरच सिद्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी खासदारांना केलेल्या संबोधनात जेटलींप्रती विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे निर्देश सर्वांना दिले. 'लालकृष्ण अडवाणी ज्या प्रमाणे हवाला प्रकरणातून दोषमुक्त झाले, त्याच पद्धतीने जेटली हे सुद्धा लवकरच या (डीडीसीए) प्रकरणात करण्यात येणा-या खोट्या आरोपांतून दोषमुक्त होतील, असे मोदी म्हणाले.
अरूण जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असताना संघटनेच्या कारभारात गैरप्रकार झाला होता असा आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दिल्लीत क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते. तसेच ते मंत्रीमंडलात असेपर्यंत त्यांची सखोल चौकशी होऊ शकत नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रीमंडळातून काढावे, अशी मागणीही 'आप'तर्फे करण्यात आली होती.
दरम्यान या आरोपांनंतर जेटली यांनी अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांविरोधात दिल्लीतील पतियाळा न्यायालयाता दहा कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. लोकसभेतील भाषणादरम्यान जेटली यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपाने या प्रकरणात जेटलींना ठोस पाठिंबा दिला असून आम्हाला अरुण जेटली यांच्या प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा आणि विश्वासहर्तेचा अभिमान असल्याचं मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी दिल्ली न्यायलयाने केजरीवाल व इतर नेत्यांना आज नोटीसही बजावली आहे.