ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:14 IST2025-11-17T15:13:35+5:302025-11-17T15:14:18+5:30
Jubilee Hills Byelection : तेलंगामामधील हैदराबाद येथील जुबली हिल्स विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी बीआरएसचा बालेकिल्ला भेदत दणदणीत विजय मिळवला.

ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
तेलंगामामधील हैदराबाद येथील जुबली हिल्स विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी बीआरएसचा बालेकिल्ला भेदत दणदणीत विजय मिळवला. जुबिली हिल्स मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी मिळवलेल्या विजयात असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला. या पाठिंबाच्या जोरावर विजय मिळवल्यानंतर नवीन यादव यांनी असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेत त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
जुबिली हिल्स मतदारसंघात बीआरएसचे मंगती गोपिनाथ हे २०१४ पासून आमदार होते. या गोपिनाथ यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहम्मद अझहरुद्दीन यांचा पराभव केला होता. दरम्यान, गोपिनाथ यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने नवीन यादव यांना उमेदवारी दिली होती. तर बीआरएसने मंगती सुनीता यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, जुबिली हिल्स मतदारसंघातील मतांचं गणित पाहता मुस्लिम मतांचं विभाजन अडचणीचं ठरू शकतं, याचा अंदाज नवीन यादव यांना होता. त्यामुळे नवीन यादव यांनी ओवेसींची भेट घेऊन मतविभाजन टाळण्यासाठी एमआयएमचा उमेदवार न देण्याची विनंती केली. ओवेसींनीही ही विनंती मान्य करत निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार उतरवला नाही. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोहम्मद अझरुद्दीन यांचा तेलंगाणाच्या सरकारमध्ये समावेश केला होता. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही मुस्लिम समुदायाला आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस ही मुस्लिमांसाठी कशी आवश्यक आहे अशा आशयाचं मोठं विधान केलं होतं. दरम्यान, येथे भाजपाचा उमेदवार रिंगणात होता. पण एमआयएमच्या माघारीमुळे काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात थेट लढत होऊन या लढतीत काँग्रेसचा विजय झाला. या विजयानंतर नवीन यादव यांनी असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
४१ नवीन यादव हे हैदराबादमधील रहिवासी आहेत. तसेच त्यांचे वडील श्रीशैलम यादव हे जुबिली हिल्समधील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. यादव कुटुंबीय हैदराबादमधील रहमतनगर, शेखपेट, युसूफगुडा आदी परिसरात राजकीय दृष्ट्या सक्रिय होतं. त्याचाही फायदा काँग्रेसला झाला. एवढंच नाही तर ग्रेट हैदराबादमध्ये यादव समाजाची संख्या लक्षणीय आहे. मात्र या समाजामधून कुणीही आतापर्यंत आमदार किंवा विधान परिषदेतील आमदान बनला नव्हता. आता नवीन यादव यांच्या रूपात या समाजाला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळालं आहे.