Journey of laborers to return to work | मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनाची साथ यामुळे आपल्या गावी गेलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांपैकी अनेक जण निर्बंध हटविण्यात येऊ लागल्यानंतर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या मजूरांनी कामावर यावे यासाठी संबंधित उद्योगांकडून त्यांन प्रवासासाठी तिकीट काढून दिले जात आहे. विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

गावी गेलेल्या शेतमजुरांना परत आणण्यासाठी भारती किसान युनियनने पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यांत दोन बस पाठविल्या होत्या. हे शेतमजूर उत्तर प्रदेशमधील पिलिभित व बिहारमधील मोतीहारी येथील मूळ रहिवासी आहेत. ते शेतीकामावर हजर होताच पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासंदर्भात भारती किसान युनियनचे प्रमुख जसगिरसिंग सिरा यांनी सांगितले की, या शेतमजुरांना बिहार, उत्तर प्रदेशवरू न आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १ लाख ८५ हजार रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील निम्मा भाग या मजुरांना देण्यात येईल. अशा आणखीे ७५ बस शेतमजूरांना आणण्यासाठी बर्नाला जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने रवाना
झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशमधील झाबुआ या
आदिवासी जिल्ह्यातले ४५०० मजूर गुजरातमधील आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले आहेत. त्यांच्या प्रवासाची सारी व्यवस्था संबंधित उद्योगांनी केली होती.

बिहारमध्ये उत्तम रोजगार मिळणे अशक्य
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील १०० मजूर नुकतेच पंजाबमधील विविध जिल्ह्यांत तसेच मथुरा येथील स्टील प्लांटमध्ये आपल्या कामावर परतले आहेत. लुधियाना येथे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या राकेश यादव याने सांगितले की, पावसाळ्यातील शेतीची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी मी पंजाबला परत जात आहे. बिहारमध्ये थांबून उत्तम रोजगार मिळण्याची शक्यता नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Journey of laborers to return to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.