पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:06 IST2025-04-08T13:05:58+5:302025-04-08T13:06:26+5:30
योग्य पात्रतेच्या आधारे नोकरी करणाऱ्या पूर्वांचल हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी केली जाते असा आरोप त्यांनी केला.

पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
नवी दिल्ली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जातेय की नाही हे पाहा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी बँकांमध्ये जात मराठी भाषेचा आग्रह धरला. यावेळी काही ठिकाणी मुजोरी करणाऱ्या कामगारांना मनसेने मारल्याच्याही घटना घडल्या. या घटनेवरून आता राज ठाकरेंविरोधात उत्तर भारतीय एकवटल्याचे चित्र आहे. मनसेच्या आंदोलनाचा हा मुद्दा संसदेत गाजल्याचं पाहायला मिळाले.
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
३ एप्रिल रोजी बिहारच्या लोक जनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला. यावेळी राजेश वर्मा म्हणाले की, कुणी व्यक्ती त्याच्या आई वडील आणि कुटुंबाला सोडून अन्य राज्यात नोकरी करतो तो आवडीने करत नाही तर मजबुरीने करतो. कुठल्याही कारखान्यात, व्यापारात, कंपन्यांत जर कर्मचाऱ्याची नियुक्ती होत असते तेव्हा ते उपकार करत नाहीत तर पात्रतेच्या आधारे नोकरी दिली जाते. योग्य पात्रतेच्या आधारे नोकरी करणाऱ्या पूर्वांचल हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी केली जाते असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे यासाठी मी हा मुद्दा सभागृहात मांडत आहे. हिंदी भाषिकांना संरक्षण देण्याचं काम सरकारने करावे कारण ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. ते पुन्हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशाप्रकारचे राजकारण करत आहेत असं खासदार राजेश वर्मा यांनी संसदेत म्हटलं.
उत्तर भारतीय विकास सेनाही आक्रमक
राज ठाकरेंविरोधात आक्रमक होत उत्तर भारतीय विकास सेनेकडून मनसेची मान्यता रद्द करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या संघटनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत इशारा दिला. RSS, बजरंग दलात ९० टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या कानफाडीत तुम्ही मारताय. उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे हे कसलं राजकारण...आम्ही तुमचा विरोध करतो, सुप्रीम कोर्टात तुमच्याविरोधात आदेश आणणारच आहे. सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभं करणार असं त्यांनी सांगितले.