'तुझी मान उडवून टाकेन, बंद कर'; आमदाराचे लाईव्ह करुन समर्थन करणाऱ्या महिलेला पतीची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:21 IST2025-09-12T15:18:44+5:302025-09-12T15:21:40+5:30
आपचे आमदार मेहराज मलिकचे समर्थन करणाऱ्या महिलेला तिच्या पतीने लाईव्हदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिली.

'तुझी मान उडवून टाकेन, बंद कर'; आमदाराचे लाईव्ह करुन समर्थन करणाऱ्या महिलेला पतीची धमकी
Mehraj Malik Arrest: जम्मू काश्मीरमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेवरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. काश्मीरच्या अनेक भागात आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात आंदोलने केली जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनाही या प्रकरणाची दखल घ्यायला लागलीय. भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष मेहराज मलिक यांच्या सुटकेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. अशातच मेहराज मलिक यांची बाजू मांडणाऱ्या एका महिलेला पतीच्या विरोधाला सामोरे जावं लागलं आहे. सोशल मीडियावर लाईव्ह करत असताना या महिलेला तिच्या पतीने मेहराज मलिक यांचे समर्थन केल्यामुळे थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
जम्मू आणि काश्मीरमधील एकमेव आप आमदार मेहराज मलिक यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याने राजकीय गोंधळ सुरूच आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय कार्यकर्त्या फातिमा फारूक फेसबुक लाईव्हवर आप आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेचा निषेध करत होत्या. लाईव्ह स्ट्रीम दरम्यान, तिचा पती रागाच्या भरात आला आणि 'लाईव्ह थांबव, नाहीतर मी तुमची मान उडवून टाकेन' अशी धमकी दिली. काही वेळातच लाईव्ह स्ट्रीम सुरु असतानाच पती-पत्नीत जोरदार वादा सुरु झाला.
फातिमा या मेहराज मलिक यांच्या अटकेमुळे संतापल्या होत्या आणि आपलं म्हणणं लाईव्हच्या दरम्यान मांडत होत्या. सर्वांना माहित आहे की मी मलिक यांची समर्थक नाही आणि उपायुक्तांविरुद्ध त्यांनी वारलेल्या अपशब्दांचा मी निषेध करते. पण सर्वजण, विशेषतः गरीब लोक, त्यांच्यावर पीएसए लादल्यामुळे निराश झाले आहेत, असं फातिमा म्हणाल्या. तितक्यात त्यांचा पती तिथे आला आणि त्याने तू हे लाईव्ह कशासाठी आणि का करतेय? असं विचारलं.
यानंतर पतीने फातिमाच्या हातातून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि धमकी दिली की मी तुझा गळा दाबून टाकीन. तुझं डोकं काम करतंय का? मेहराज तुझा कोण लागतो? तुला मूर्खासारखी बोलायची काय गरज आहे? लाईव्ह करणारी तू कोण आहेस? असं तिच्या पतीने म्हटलं. तरीही फातिमा ठाम राहिली, तिने कॅमेरा फिरवला आणि म्हणाली, 'सर्वांनी पहा! हा माझा नवरा आहे, मी सत्याच्या बाजूने उभी आहे.' नवऱ्याने पुन्हा रागात धमकी दिली की,'थांबव, नाहीतर मी तुझी मान उडवून टाकीन, मी तुला माझ्या बुटांनी मारेन. लाईव्ह थांबव.' काही सेकंदांनंतर लाईव्ह स्ट्रीम कट होते.
आता पोलिसांनी फातिमा आणि तिच्या पती दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पतीवर पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे, तर फातिमावर प्रतिबंधात्मक आदेश लागू झाल्यानंतरही फेसबुकवर लाईव्ह केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सार्वजनिक सुरक्षा कायदा किंवा पीएसए हा एक कायदा आहे जो पूर्वी फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध वापरला जात होता. या अंतर्गत कोणालाही दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवता येते. त्याच्याविरुद्ध कोणत्याही खटल्याची आवश्यकता नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असताना जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून ही कारवाई केली जाते. डीसी हरविंदर सिंग यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर मेहराज मलिक यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे, ज्याचा बराच विरोध होत आहे.