BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:37 IST2024-12-19T16:29:07+5:302024-12-19T16:37:29+5:30
संसदेतल्या राड्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..."
Parliament Winter Session: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व नेते निळ्या कपड्यात संसदेत आले होते. काँग्रेसला आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन भाजपला कोंडीत पकडण्याची संधी होती. मात्र दुपारपर्यंत सारे प्रकरण त्यांच्याच अंगलट आले. भाजपचे नेतेही काँग्रेसविरोधात आंदोलन करत होते. मात्र दोन्ही बाजूचे खासदार जेव्हा संसदेच्या मकर गेटवर पोहोचले तेव्हा बाचाबाची सुरू झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी पडून जखमी झाले. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोप लावल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन संसदेबाहेर आंदोलनादरम्यान धक्काबुक्की झाली. भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत
या घटनेत जखमी झालेले प्रताप सारंगी यांनी राहुल गांधींवर आरोप केला. त्याचवेळी दुसरे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल यांना यासाठी जबाबदार धरले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे मकरद्वार येथे भाजप खासदारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्याशी बाचाबाची केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
"राहुल गांधींनी माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला," असा आरोप प्रताप सारंगी यांनी केला. दुसरीकडे, मात्र राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी असं काही करु शकत नाही, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.
ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे. "मी राहुल गांधींना ओळखतो. ते संसद सदस्य सोडा कोणाला धक्का देणार नाहीत. कोणाशीही असभ्य किंवा वाईट वागणे त्यांच्या स्वभावात नाही," असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.
I know Rahul, he would not push anyone much less a member of parliament. It’s simply not in his nature to be rude or nasty to anyone. https://t.co/t0zCaQRvHT
— Omar Abdullah (@OmarAbdullah) December 19, 2024
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की, "राहुल गांधी धक्काबुक्कीसाठी आले होते. त्यांचे वर्तन गुंडासारखे होते. हा देश गुंडांना खपवून घेणार नाही. आमच्या एका वयोवृद्ध खासदाराला त्यांनी धक्काबुक्की करून खाली पाडले."