जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:11 IST2025-11-15T09:05:47+5:302025-11-15T09:11:24+5:30
जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा बळी गेला आहे.

जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
J&K Blast:जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित चौकशी सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारच्या रात्री उशिरा सुमारे ११:२० वाजता श्रीनगर येथील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे पोलीस स्टेशनची इमारत हादरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, २७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये जप्त करुन ठेवलेल्या स्फोटकांचे नमुने घेत असतानाच हा भीषण स्फोट झाला.
हा स्फोट एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील वेळी झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात नुकत्याच जप्त केलेल्या स्फोटक साठ्यामधून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम नमुने काढत असताना हा स्फोट झाला. या स्फोटकांचा साठा नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता. या स्फोटाची तीव्रता अत्यंत भयानक होती. स्फोटामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचा एक मोठा भाग पूर्णपणे कोसळला असून, बचाव पथकाला ढिगारा हटवण्यात अडचणी येत आहेत. घटनेच्या ठिकाणापासून ३०० फुटांपर्यंत मानवी अवयवांचे तुकडे सापडले आहेत, यावरून स्फोटाची भीषणता लक्षात येते. काही लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.
घातपात की निष्काळजीपणा?
या स्फोटामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये ३५० किलो अमोनियम नायट्रेट आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य ठेवले होते. स्फोटके सील करताना किंवा नमुने तपासण्यासाठी बाहेर काढताना, ती चुकीच्या पद्धतीने हाताळली गेली असावी. या हाताळणीतील चुकीमुळेच स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हा अपघात नसून, जाणूनबुजून केलेला घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त केलेली एक कार उभी होती. ही कार पूर्वी काही बेकायदेशीर कामात वापरल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली होती. त्या कारमध्ये बॉम्ब लावला गेला असावा. या बॉम्बचा स्फोट झाल्यावर, बाजूला ठेवलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातही मोठा स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीएएफएफ नावाच्या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळत आहे, पण त्याची तपासणी चालू आहे.
हा संपूर्ण स्फोट आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आहे. याची सुरुवात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटापासून झाली होती, ज्यात १३ लोक मारले गेले होते. दिल्ली स्फोटानंतर सुरू झालेल्या तपासात दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे नौगाममध्ये आढळले. या तपासादरम्यान स्थानिक रहिवाशांसह फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातून डॉ. मुजम्मिल गनई आणि शाहीन सईद या डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. डॉ. गनई याच्या भाड्याच्या घरातूनच ३५० किलोहून अधिक स्फोटके जप्त करण्यात आली होती, जी नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती.
तपासाला कशी झाली सुरुवात
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलविरुद्ध नौगाम पोलिस ठाण्यात पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. ऑक्टोबरमध्ये नौगामच्या बनपोरा भागात पोलिस आणि सुरक्षा दलांना धमकी देणारे पोस्टर्स आढळल्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. १९ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि विशेष तपास पथक स्थापन केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी त्यानंतर आरिफ निसार दार उर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ शाहिद या तीन संशयितांना अटक केली. त्यांच्यावर दगडफेकीचे पूर्वीचे गुन्हे होते आणि ते पोस्टर्स चिकटवताना दिसले होते.