जिंदल, भटकळच्या जिवाला धोका
By Admin | Updated: July 8, 2015 23:40 IST2015-07-08T23:40:26+5:302015-07-08T23:40:26+5:30
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर- ए- तय्यबाचा अतिरेकी अबू जिंदल याच्या जीवाला धोका असल्याची भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली असल्याची माहिती राष्ट्रीय

जिंदल, भटकळच्या जिवाला धोका
नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर- ए- तय्यबाचा अतिरेकी अबू जिंदल याच्या जीवाला धोका असल्याची भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली न्यायालयाला दिली आहे. इंडियन मुजाहिदीनचा सह संस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा ऊर्फ यासीन भटकळ याने पोलीस आपल्याला जिवे मारतील, अशी भीती व्यक्त करतानाच २४ तास निगराणी ठेवण्याची विनंती विशेष न्यायालयाकडे केली आहे.
अबूला कारागृहातून हलविताना त्याच्या प्रतिस्पर्धी गटाकडून अपहरण आणि हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करणारा अर्ज एनआयएने जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांच्याकडे सादर केला आहे. तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्याविरुद्ध वारंवार वॉरंट जारी होऊनही त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मे २०१३ मध्ये अबूला न्यायालयात व्यक्तिश: हजर न करण्याबाबत ठराव पारित केला होता. त्याला अबूने आव्हान दिले असता मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता, याकडे एनआयएने लक्ष वेधले. जिंदलचा खटला तातडीने निकाली काढावा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे सुनावणी केली जावी, अशी विनंतीही या तपास संस्थेने केली. (वृत्तसंस्था)