गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:37 IST2025-09-07T14:37:32+5:302025-09-07T14:37:59+5:30
एका गरीब जोडप्याने त्यांच्या एक महिन्याच्या मुलाला ५०,००० रुपयांना विकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील लेस्लीगंज भागात एका गरीब जोडप्याने त्यांच्या एक महिन्याच्या मुलाला ५०,००० रुपयांना विकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने याची दखल घेतली आणि पोलिसांना मुलाला शोधून काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत लातेहार जिल्ह्यातून मुलाला परत आणलं आणि त्याच्या पालकांच्या ताब्यात दिलं.
रिपोर्टनुसार, लोटवा गावातील रामचंद्र आणि त्याची पत्नी पिंकी देवी गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंजत होते. सततच्या पावसामुळे रामचंद्र काम करू शकत नव्हते. कुटुंबाकडे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड नव्हतं, ज्यामुळे ते सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले. त्यांच्याकडे राहण्यासाठी कायमस्वरूपी घरही नव्हतं आणि त्यांना चार मुलांसह एका जुन्या घरात राहावं लागलं.
पिंकी देवीने एका मुलाला जन्म दिला होता, त्यानंतर ती आजारी पडली. रामचंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे पत्नीच्या उपचारासाठी पैसे नव्हते आणि मुलांसाठी जेवणही नव्हतं. असहाय्यतेमुळे त्याने मुलाला शेजारच्या गावातील एका जोडप्याला ५०,००० रुपयांना विकलं. ही बाब उघडकीस येताच पलामू प्रशासनाने कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने कुटुंबाला २० किलो अन्नधान्य दिलं आणि त्यांना कल्याणकारी योजनांमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली.
लेस्लीगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी उत्तम कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातेहार येथे पोलिसांचं पथक पाठवण्यात आलं होतं, जिथून मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्याच वेळी, पलामूचे उपविकास आयुक्त जावेद हुसेन म्हणाले की, मीडिया रिपोर्ट्सवरून या प्रकरणाची माहिती मिळाली होती, त्यानंतर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली.