In Jharkhand elections, the BJP will have to face a multitude of contests | झारखंडच्या निवडणुकीत भाजपला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागणार

झारखंडच्या निवडणुकीत भाजपला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागणार

रांची : ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून, ३० नोव्हेंबरपासून मतदानास सुरुवात होईल. त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे.
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर ५० जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपची कोंडी केली.
भाजपने आपल्या सहकारी पक्षांमधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात विरोधकांनी कोणताही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या राज्यात भाजपला बेरोजगारी, शेती व आर्थिक मंदी यासारख्या मुद्यावर जनमताला बरोबर घेणे तारेवरची कसरत करण्यासारखे ठरणार आहे.
राज्यात सरकारविरोधी जनमत नाहीच. विरोधकांची अनेक शकले पडली आहे, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. महाराष्टÑात भाजप व शिवसेना यांची ३० वर्षांची युती तुटल्याचा काही परिणाम झारखंडमध्ये होईल का, असे विचारले असता एका नेत्याने सांगितले की, महाराष्टÑासारखी स्थिती येथे येऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. बंडखोरांनी भाजपची मते कमी करू नयेत, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. लोजपा व जदयू येथे स्वबळावर लढले तरी पक्षाला चिंता नाही, कारण केंद्रात हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये आहेत.
मागील निवडणुकीत भाजपने ३७ जागा, तर एजेएसयूने ५ जागा जिंकल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा पक्ष स्वबळावर लढत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In Jharkhand elections, the BJP will have to face a multitude of contests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.