जेईईचा ‘टॉपर’ चिराग घेणार नाही आयआयटीला प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 05:48 IST2020-10-06T05:48:40+5:302020-10-06T05:48:54+5:30
केवळ कौशल्य तपासण्यासाठी दिली परीक्षा; अमेरिकेतील एमआयटीत घेणार शिक्षण

जेईईचा ‘टॉपर’ चिराग घेणार नाही आयआयटीला प्रवेश!
पुणे : आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याच्या चिराग फलोर या विद्यार्थ्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र तो भारतात कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणार नाही. त्याला अमेरिकेतील 'एमआयटी केंब्रीज’ येथे प्रवेश मिळाला असून चार वर्षे तो अमेरिकेतच शिक्षण पूर्ण करणार आहे.
चिराग फलोर याने सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत ३९६ पैकी ३५२ गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्याने जेईई मेन्स परीक्षेत ३०० पैकी २९६ गुण मिळवले होते.
अमेरिकेत एमआयटीच्या प्रवेश परीक्षेत त्याने चांगले यश मिळविले होते. इंटरनॅशनल आॅलिम्पियाड स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘बाल शक्ती’ पुरस्काराने गौरविले. मोदी यांनी ट्विटमध्ये चिरागचा ‘माझा मित्र’ असा उल्लेख केला होता. चिराग मूळचा राजस्थानचा असून त्याने अकरावी- बारावीचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. त्याचे वडील खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.
अॅण्ड्रॉइड मोबाइलचा वापर बंद
गेल्या चार वर्षांपासून मी अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करत होतो. मागील वर्षी मी अॅण्ड्रॉइड मोबाइल वापरणे बंद केले होते. स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्यासाठी मी जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिली होती. देशात पहिला येण्याची इच्छा आणि अपेक्षा होती. मला अॅस्ट्रोफिजिक्स क्षेत्रात संशोधन करायचे आहे. - चिराग फलोर
१५ वर्षांतला नीचांकी निकाल : जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा गेल्या पंधरा वर्षातील यंदा सर्वात कमी निकाल लागला आहे. २०१६ मध्ये २० टक्क्यांपर्यंत निकाल खाली आला होता. मात्र यंदा खुल्या संवर्गाचा निकाल १७.५ टक्के तर एससी, एसटी संवर्गाचा निकाल पावणे नऊ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे यावर्षी जेईई अॅडव्हान्स परीक्षा अवघड होती. हे स्पष्ट होते. - दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक