कर्नाटकमध्ये जेडीएसने केली 12 जागांची मागणी, मनधरणीसाठी काँग्रेसने केले दिग्गजांना पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 16:13 IST2019-01-01T16:13:30+5:302019-01-01T16:13:57+5:30
कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.

कर्नाटकमध्ये जेडीएसने केली 12 जागांची मागणी, मनधरणीसाठी काँग्रेसने केले दिग्गजांना पाचारण
बंगळुरू - कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी जेडीएसने काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली असून, कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली आहे. जेडीएसबरोबर निर्माण झालेला हा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याकडे मदत मागितली आहे.
चंद्राबाबू नायडू, शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एनडीएविरोधात राष्ट्रीय आघाडी बनवण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे. आता हे तिन्ही नेते जानेवारीच्या मध्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करणार आहेत.
प्रादेशिक पक्षांनी आपण जिंकू शकतो एवढ्याच जागांची मागणी केली पाहिजे, असे टीडीपीचे प्रवक्ते कमबमपती राममोहन राव म्हणाले. कर्नाटकमध्ये आघाडीचा निर्णय झाल्यानंतर सर्वपदांचे वाटप 2:1 अशा पटीत व्हावे, असे निश्चित करण्यात आले होते. या फॉर्म्युल्यानुसार जेडीएसला कर्नाटकमध्ये एकूण दहा जागा मिळू शकतात. मात्र देवेगौडा यांनी एकूण 12 जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच देवैगौडा यांनी चिक्काबल्लूपुरा या जागेवरही दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे. चिक्काबल्लूपुरा जागेवर सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली हे खासदार आहेत.