जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 05:56 IST2025-12-24T05:56:27+5:302025-12-24T05:56:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी 'विज्ञान ...

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी 'विज्ञान रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांना दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने सन्मानित केले जाते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात देशभरातील २५ वैज्ञानिकांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन सन्मानित केले. यात विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम अशा श्रेणींचा समावेश आहे.
१४ शास्त्रज्ञांना विज्ञान युवा पुरस्कार
राष्ट्रपतींनी पद्मविभूषण जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित केले. विज्ञान युवा श्रेणीत आठ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री आणि १४ शास्त्रज्ञांना विज्ञान युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर विज्ञानातील संघ पुरस्कार अरोमा मिशन सीएसआयआरला देण्यात आला.
मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे डॉ. युसुफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), मुंबईतील इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे अनिरुद्ध भालचंद पंडित यांना (अभियांत्रिकी विज्ञान), नागपूरच्या नीरीचे डॉ. एस. वेंकट मोहन यांना (पर्यावरण विज्ञान), मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे महान महाराज आणि सब्यसाची मुखर्जी यांना (गणित आणि संगणकीय विज्ञान), पुण्याच्या आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राचे सुहृद श्रीकांत मोरे यांना (भौतिक विज्ञान) आणि बंगळुरूच्या राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्राच्या डॉ. दीपा आगाशे यांना (जैविक विज्ञान) क्षेत्रात केलेल्या असाधारण कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.