हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:27 IST2025-08-27T15:25:59+5:302025-08-27T15:27:44+5:30

वैष्णोदेवी यात्रेदरम्यान झालेल्या मोठ्या भूस्खलनाने अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला.

jammu vaishno devi younger brother phone call mannu died | हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन

फोटो - आजतक

जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी यात्रेदरम्यान झालेल्या मोठ्या भूस्खलनाने अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील सामान्य कुटुंब या घटनेने उद्ध्वस्त झालं आहे. 

नगर कोतवाली परिसरातील रामलीला टिल्ला येथील रहिवासी ४६ वर्षीय मिंटू कश्यप हे त्यांची पत्नी बबली, मुलगी उमंग, मुलगा कार्तिक यांच्यासह वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र घरी परतण्यापूर्वी असं काहीतरी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. हे कुटुंब आधीच वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन घरी परतण्याच्या तयारीत होतं. पण वाटेत अचानक झालेल्या भूस्खलनाने सर्व काही बदलून गेलं.

"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?

जड दगड पडल्यामुळे अनेक भाविक गाडले गेले. मिंटू कश्यपच्या कुटुंबालाही गंभीर दुखापत झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा १८ वर्षांचा एकुलता एक मुलगा कार्तिकचा (मुन्नू) मृत्यू झाला. अपघातानंतर मिंटू कश्यपने त्याचा भाऊ बाबूराम कश्यपला एका अनोळखी नंबरवरून फोन केला. बाबूराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "त्याचा धाकटा भाऊ फोनवर ढसाढसा रडत होता."

"तो म्हणत होता, भाऊ, सर्वनाश झाला आहे... आपला मुन्नू गेला. बाकी सर्वजण जखमी आहेत. ते रुग्णालयात आहेत पण आपला मुन्नू आता आपल्यात राहिला नाही. हे ऐकताच मी हादरलो. मी काय सांगू, तो घरातील एकुलता एक मुलगा होता." कार्तिकच्या मृत्यूची बातमी ऐकून आई बेशुद्ध पडली. कुटुंबातील सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री कपिल देव अग्रवाल पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, ही एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. जम्मूमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेकांचा जीव गेला आहे. आमच्या मुझफ्फरनगरमधील कुटुंबावरही संकट आलं. कार्तिकचा मृत्यू झाला आणि उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
 

Web Title: jammu vaishno devi younger brother phone call mannu died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.