Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 08:36 IST2025-10-14T08:35:52+5:302025-10-14T08:36:29+5:30
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मोठं यश आलं.

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मोठं यश आलं आहे. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे. घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली.
भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम तीव्र केली आहे. अलिकडच्या काळात सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत. संयुक्त कारवाईदरम्यान, लष्कर आणि पोलिसांनी वारसन परिसरातील ब्रिजथोर जंगलात एका दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. सुरक्षा दलांनी दोन एके-सिरीज रायफल, चार रॉकेट लाँचर, दारूगोळ्याचा मोठा साठा आणि इतर युद्ध साहित्य जप्त केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या चिनार कोरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. परिसरात लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये यापूर्वी चकमक झाली होती. त्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले होते.
दोन जवान देखील यावेळी शहीद झाले होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख अमीर अहमद दार अशी झाली आहे, जो शोपियानचा रहिवासी आहे. तसेच तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता आणि सप्टेंबर २०२३ पासून यामध्ये सक्रिय होता. पहलगाम हल्ल्यानंतर सोडण्यात आलेल्या १४ वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.