जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्रालमध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याच दरम्यान त्राल चकमकीचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.
या ड्रोन फुटेजमध्ये एक दहशतवादी लपलेले दिसत आहेत. जैशच्या दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा होताना दिसत आहे. आणखी दहशतवादी अजूनही लपले असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
आज सकाळी जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे सर्वजण त्रालचे रहिवासी आहेत. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी आणि यावर अहमद बट्ट अशी त्यांची नावं आहेत. त्रालच्या नादेर गावात ही चकमक सुरू आहे. पुलवामामध्ये ४८ तासांत झालेली ही दुसरी चकमक आहे. मंगळवारी शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी अवंतीपोरा येथील त्रालच्या नादेरमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली. भारतीय सैन्य, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने त्रालमधील नादेरला वेढा घातला. जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या, त्यानंतर दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यात आला. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
मंगळवारी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या विशेष कारवाईत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. जिनपथेर केलर परिसरात सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना घेरलं होतं. या ऑपरेशनला ऑपरेशन केलर असं नाव देण्यात आले. या कारवाईत मारल्या गेलेल्या लष्कर दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव शाहिद होतं, जो शोपियानचा रहिवासी होता.