गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:09 IST2024-10-24T21:07:16+5:302024-10-24T21:09:23+5:30
Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत, तर लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेपासून (एलओसी) 5 किमी अंतरावर ही धक्कादायक घटना घडली आहे.
STORY | Army porter killed, 3 soldiers among five injured in terror attack in J-K's Gulmarg
— Press Trust of India (@PTI_News) October 24, 2024
READ: https://t.co/OAIdzuD8ZO#JammuKashmirpic.twitter.com/X58B42DLZV
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात लावून लष्कराच्या वाहनावर हा हल्ला केला. माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली असून, परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
मजुरांवरील हल्ले वाढले
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये इतर राज्यातील मजुरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी यूपीमधील एका मजुराला गोळ्या घालून जखमी केले. याआधी गेल्या रविवारी गांदरबल जिल्ह्यात एका बांधकाम साइटवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 6 मजूर आणि एका स्थानिक डॉक्टरचा मृत्यू झाला, तर 18 ऑक्टोबरला शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला
गांदरबल येथील झेड मोड बोगदा प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. खोऱ्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील बांधकाम कामगारांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला होता. हा हल्ला अशा भागात झाला आहे, जिथे गेल्या दशकात दहशतवाद्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. रविवारी रात्री 8.30 वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. कर्मचारी मेसमध्ये जेवण करत असताना तीन दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन वाहनेही जळून खाक झाली.