सर्जिकल स्ट्राइकचा 'हिरो' ठरणार काश्मिरातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 17:33 IST2018-06-01T17:33:30+5:302018-06-01T17:33:30+5:30
पाकिस्तानला त्यांच्याच धर्तीवर धडा शिकवणा-या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्यावरच जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सर्जिकल स्ट्राइकचा 'हिरो' ठरणार काश्मिरातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ
नवी दिल्ली- 2016मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. पाकिस्तानला त्यांच्याच धर्तीवर धडा शिकवणा-या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्यावरच जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाकिस्तानविरोधात लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांच्या नेतृत्त्वात सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांना जनरल देवराज अंबू यांच्या स्थानी नियुक्त करण्यात आलं आहे. तर अंबू यांची सैन्याच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह आता उत्तर भागात नव्या कमांडरची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ते आता जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाविरोधात लढा देणार आहेत.
2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती जनरल रणबीर सिंह यांनीच पहिल्यांदा सार्वजनिक केली होती. रणबीर सिंह लहान णसातनाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. लहानपणापासून त्यांचं लष्करात भरती व्हायचं स्वप्न होतं. भारतीय लष्करात कर्नल असलेले त्यांचे काका मनमोहन सिंह यांनी त्यांचा सांभाळ केला. जालंधरमध्ये जन्मलेल्या रणबीर सिंह यांचं प्राथमिक शिक्षण कपूरथला एका सैनिकी शाळेत झालं होतं. त्यानंतर 1980मध्ये भारतीय सैन्य अकादमी, डेहराडूनसाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांची पहिली पोस्टिंग 9 डोगरा रेजिमेंटमध्ये झाली होती. डीजीएमओनंतर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांना पदोन्नती देत सर्जिकल स्ट्राइक 1 कोअरचं कमांडर बनवण्यात आलं होतं. लष्कराची ही कोर टीम पाकिस्तानात घुसून हल्ला करण्यासाठी नेहमीच सज्ज असते.