जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:07 IST2025-04-22T20:07:05+5:302025-04-22T20:07:28+5:30
Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
Jammu Kashmir Attack :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. पहलगाममध्ये आज(22 एप्रिल 2025) पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 27 पर्यटकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. दहशतवादी संघटना TRF ने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या घटनेनंतर भारतीय लष्करासह केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून, दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तात्काळ श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी आयबी आणि रॉ प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनीदेखील गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, कठोर कारवाईचे निर्देश दिले.
हिंदूंची टार्गेट किलिंग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितले की, दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांनी आधी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला, त्यानंतर ठरवून हिंदू धर्मीय पर्यटकांवर गोळीबार सुरू केला. सुरुवातीला या घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू अन् अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. पण, आता हा आकडा 27 पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि दोषींना सोडणार नसल्याचा इशाराही दिला. मोदींसोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शाहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आणि दुःख व्यक्त केले. अशा कठीण काळात सर्व देश एकजूट असल्याचेही विरोधकांनी दाखवून दिले.
पर्यटकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी अनंतनागमध्ये एक आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 व्हाट्सअॅप) हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.