हीच पक्षाची मोठी कमजोरी! काँग्रेसच्या मराठमोळ्या महिला नेत्यानं राहुल गांधींना दाखवल्या उणिवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 19:36 IST2021-09-10T19:32:19+5:302021-09-10T19:36:34+5:30
जम्मूच्या प्रभारींनी भरसभेत राहुल गांधींनी सांगितल्या पक्षाच्या त्रुटी

हीच पक्षाची मोठी कमजोरी! काँग्रेसच्या मराठमोळ्या महिला नेत्यानं राहुल गांधींना दाखवल्या उणिवा
जम्मू: काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एक संमेलन संपन्न झालं. यामध्ये राहुल गांधी यांची अवस्था अतिशय बिकट झाली. कारण पक्षाच्या जम्मूच्या प्रभारी रजनी पाटील यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचं समर्थन केलं. मात्र भाषण संपवताना त्यांनी बाजू सावरून घेतली.
तुमच्यासमोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, असं पाटील यांनी राहुल गांधींना सांगितलं. 'कार्यकर्ते अतिशय अडचणीतून जात आहेत. त्यांनी गेली दोन वर्षे समस्यांचा सामना केला आहे. त्यांचा संघर्ष जम्मू आणि केंद्र सरकार अशा दोघांशी आहे. राहुलजी, हे काँग्रेसचे शूर शिपाई आहेत. ते तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार आहेत आणि हीच काँग्रेसची सर्वात मोठी ताकद आहे,' असं रजनी पाटील म्हणाल्या.
लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी
रजनी पाटील यांनी दाखवल्या त्रुटी
कार्यकर्ते हीच काँग्रेसची खरी ताकद आहे. मात्र आज हीच ताकद कमजोर झाली आहे. कारण यांना आमच्याकडून आणि तुमच्याकडून कोणतीही ताकद मिळत नाही. सर्व बडे नेते कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी असं म्हणतात. मात्र त्याची अंमलबजावणी कोणीही करत नाही. पक्षात असलेली ही सर्वात मोठी त्रुटी आहे, असं पाटील म्हणाल्या.
कोण आहेत रजनी पाटील?
सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या रजनी पाटील बीडच्या खासदार राहिल्या आहेत. १९९६ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. २०१३ मध्ये काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रात देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९९२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात केली. त्यावेळी त्या जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या.