श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचे सहा अतिरेकी ठार झाले. अतिरेक्यांच्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचा निराला हा कमांडो शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला.लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, बंदीपोरा जिल्ह्याच्या चंदनगीर गावातील इमारतीत दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच त्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाचे पथक व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांच्या संयुक्त तुकडीने तेथे वेढा घातला.वेढा आवळत गेल्यावर इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी यावर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा दहशतवादी मारले गेले.मारल्या गेलेल्या सहा अतिरेक्यांपैकी ओवेद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवीचा पुतण्या आहे. संध्याकाळी काळोख पडेपर्यंत चकमक सुरू होती, असेही प्रवक्त्याने सांगितले. दहशतवाद्यांकडून शहीद झालेला कमांडो हवाई दलाच्या गरुड नामक स्पेशल फोर्सेस युनिटचा होता. (वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबाच्या सहा अतिरेक्यांचा खात्मा, एका जवानास वीरमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 08:29 IST