Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 4 महिन्यांत तब्बल 62 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:55 IST2022-04-28T15:45:02+5:302022-04-28T15:55:05+5:30
Jammu And Kashmir : विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या 62 दहशतवाद्यांपैकी 39 लश्कर-ए-तोयबाचे होते आणि 15 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 4 महिन्यांत तब्बल 62 दहशतवाद्यांचा खात्मा
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश मिळालं आहे. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत विविध कारवाईमध्ये 62 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, त्यामध्ये 15 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीर प्रदेशाचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या 62 दहशतवाद्यांपैकी 39 लश्कर-ए-तोयबाचे होते आणि 15 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.
विजय कुमार यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिनचे सहा दहशतवादी आणि अल बद्रचे दोन दहशतवादीही मारले गेले आहेत. घाटी पोलीस प्रमुखांनी 62 पैकी 47 दहशतवादी स्थानिक होते तर 15 परदेशी होते असं म्हटलं आहे. याआधी, पुलवामा जिल्ह्यातील मित्रिगाम गावात रात्रभर झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी अल बद्र (दहशतवादी संघटना) च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.
काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख एजाज हाफिज आणि शाहिद अयूब अशी झाली आहे. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या दोन दहशतवाद्यांचा या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान पुलवामा येथे स्थलांतरित मजुरांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग होता.
मित्रिगाम चकमकीच्या पार्श्वभूमीवर पुलवामा जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एका मोठ्या बागेत दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी मित्रिगाम गावाला वेढा घातला. यानंतर बुधवारी दुपारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, जी रात्री उशिरापर्यंत चालली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.