Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:20 IST2025-12-24T14:19:30+5:302025-12-24T14:20:49+5:30
Leopard Attack: वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू.

Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
Leopard Attack: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे खळबळ उडाली आहे. अनंतनागच्या कप्रान परिसरात जंगलातून भरकटत आलेला एक बिबट्या थेट केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कॅम्पमध्ये शिरला आणि सीआरपीएफ जवानावरदेखील हल्ला केला. या घटनेत संबंधित जवान जखमी झाला आहे.
A CRPF jawan was injured after a leopard entered a paramilitary camp in Anantnag district of South Kashmir and attacked him on Wednesday. pic.twitter.com/Y8nHGJhtne
— Aadi The Manifested One (@AadiVagabond) December 24, 2025
घटना कशी घडली?
आज सकाळी कप्रान परिसरात जंगलातून वाट चुकलेला बिबट्या अचानक वस्तीमध्ये दाखल झाला. बिबट्या दिसताच गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बिबट्याने एका भिंतीवरून उडी मारत थेट सीआरपीएफ कॅम्पमध्ये प्रवेश केला. कॅम्पमधील मेसमध्ये जवान नाश्ता करत असतानाच बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. हल्ल्यानंतर बिबट्या पुन्हा जवळच्या जंगलाच्या दिशेने पळून गेला.
बिबट्याला बेशुद्ध करण्याची कारवाई सुरू
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभागाची पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याला बेशुद्ध (ट्रँक्विलाइज) करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Anantnag, Jammu and Kashmir: A leopard suddenly entered a residential area and killed a five-year-old girl.
— IANS (@ians_india) December 18, 2025
Wildlife Department Range Officer Altaf Kausar Kol says, "This incident occurred last evening. The public has been advised not to allow children to go outside at night.… pic.twitter.com/zgGLHIEVav
जखमी जवानावर उपचार सुरू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या सीआरपीएफ जवानाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याची चिंता
गेल्या काही काळापासून अस्वल आणि बिबट्यांसारखे वन्य प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये शिरत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होत असून, रहिवासी भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.