जम्मू - जम्मू-काश्मीरमधील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जम्मूत प्रचंड हाहाकार माजला आहे. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेत बचाव कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या बुधवारी ४१ वर पोहोचली आहे.
रियासी जिल्ह्यातील पर्वतीय प्रदेशात असलेल्या वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाले. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान २० लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची भीती असल्याने शोधकार्य सुरूच आहे. आता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा स्थगित करण्यात आली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यातील ताज्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. पूरग्रस्तांसाठी तत्परतेने मदत दिल्याबद्दल आभार मानले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. तर मदत आणि बचाव कार्यात यश मिळावे, अशा शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिल्या.
कर्तारपूर कॉरिडॉर जलमय; १०० जण अडकलेपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात रावी नदीच्या पुरामुळे शीखांचे पवित्र धार्मिक स्थळ गुरुद्वारा दरबार साहिबसह संपूर्ण कर्तारपूर कॉरिडॉर पूर्णपणे जलमय झाला आहे. त्यामुळे तिथे १०० हून अधिक लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांमहो बहुतांश कर्तारपूर प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी असून, त्यांची बोटी तसेच हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अनेक ठिकाणी भूस्खलनकटरा ते मंदिरापर्यंतच्या १२ किलोमीटरच्या वळणाच्या प्रवासाच्या अर्ध्या अंतरावर, अर्धकुंवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले. मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यामध्ये हिमकोटी पायी मार्गावरील प्रवास सकाळपासूनच थांबवण्यात आला होता.
जम्मूहून रेल्वे सेवा पूर्ववतएक दिवस स्थगित ठेवण्यात आलेली रेल्वेसेवा बुधवारी जम्मूहून पूर्ववत करण्यात आली. सहा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी उत्तर रेल्वेने जम्मू आणि कटरा रेल्वे स्थानकांवरून जा-ये करणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या होत्या, तर विभागातील विविध स्थानकांवर २७गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.
अनंतनाग, श्रीनगरमध्ये घरांत पाणी शिरलेअनंतनाग आणि श्रीनगरमध्ये झेलम नदीने पुराची पातळी ओलांडली आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी काही भागांत पाणी घुसले आहे. दूरसंपर्क सेवा २२ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर अंशतः सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूमध्ये पोहोचले आहेत.
३८० मिमी पाऊसजम्मू शहरात २४ तासांत ३८० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या ठिकाणी १९१० मध्ये वेधशाळा स्थापन केल्यापासून २४ तासांत पडलेला हा आजवरचा सर्वाधिक पाऊस आहे. तवी, चिनाब, उझ, रावी व बसंतरसह सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. उधमपूरमध्ये ६२९.४ मिलीमीटर पाऊस झाला.
जम्मूच्या पूरग्रस्त भागातून ९० जणांना वाचवलेजम्मूच्या पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी हवाई दलाने एमआय-१७ आणि चिनूक हेलिकॉप्टर तैनात केले आहे. सायंकाळपर्यंत २० जणांना वाचण्यात यश आले आहे. त्यापैकी काही लष्कराचे सैनिक आहेत. दोन विमानांनी एकत्रितपणे १२४ कर्मचारी, २२ टन साहित्य हलवले आहे. संपर्क तुटलेल्या भागांत पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे पुरवली जाताहेत.
पाकला दुसऱ्यांदा इशारामुसळधार पावसामुळे धरणांमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने तवी नदीला पूर येण्याची दाट शक्यता असल्याचा व सतर्क राहण्याचा इशारा भारताने पाकिस्तानला पुन्हा दिला. मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने परराष्ट्र खात्यामार्फत ही माहिती कळवली आहे.