उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:23 IST2025-08-07T12:23:06+5:302025-08-07T12:23:31+5:30
Jammu And Kashmir: अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले.

उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
Jammu And Kashmir:जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे एक भीषण अपघात घडला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारा ट्रक बसंतगड येथे दरीत कोसळल्यामुळे दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. सर्व जखमींना कमांड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.
उधमपूरचे अतिरिक्त एसपी संदीप भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८७ व्या बटालियनचे एक वाहन आज (दि.7) सकाळी १८ सैनिकांना घेऊन कडवा येथून बसंतगडच्या दिशेने जात होते. यादरम्यान १०:३० वाजता ट्रक दरीत कोसळले. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.''
J&K | Two CRPF personnel died and 12 others were injured after a CRPF vehicle met with an accident near Kandva in the Basantgarh area of Jammu and Kashmir's Udhampur district. Police rushed to the spot and started a rescue operation, and shifted all injured persons to the nearby… https://t.co/uJhJpj9bsZ
— ANI (@ANI) August 7, 2025
स्थानिक लोक मदतीसाठी पुढे आले
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, 'सीआरपीएफ वाहनाच्या अपघाताची बातमी ऐकून मला दुःख झाले आहे. वाहनात अनेक शूर सीआरपीएफ सैनिक होते. बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले आहे. स्थानिक लोकही स्वतःहून मदत करण्यासाठी पुढे आले. शक्य तितकी मदत पुरवली जात आहे.''
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही शोक व्यक्त केला
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले की, 'सीआरपीएफ जवानांच्या मृत्युच्या बातमीने मला दुःख झाले आहे. देशासाठी त्यांनी केलेली सेवा आम्ही कायम लक्षात ठेवू.'